पुणे : कांदा, टोमॅटो, मिरची, फ्लॉवर, कोबी, मटार महागले

पुणे : कांदा, टोमॅटो, मिरची, फ्लॉवर, कोबी, मटार महागले

पुणे : राज्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस झाल्याने त्याचा परिणाम फळभाज्यांच्या दर्जासह आवक घटण्यावर झाला आहे. मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, फ्लॉवर, कोबी, मटार व पावट्याच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली. तर मागणीअभावी काकडीच्या दरात दहा टक्क्यांनी घसरण झाली.

मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी (दि. 2) राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे 90 ते 95 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक स्थिर असल्याचे सांगण्यात आले. परराज्यांतून आलेल्या शेतमालामध्ये कर्नाटक व गुजरात येथून सुमारे 8 ते 10 टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश व तमिळनाडू येथून शेवगा 2 ते 3 टेम्पो, इंदौर येथून 2 ते 3 टेम्पो गाजर, गुजरात येथून 5 ते 6 टेम्पो भुईमूग शेंग, कर्नाटक येथून 3 टेम्पो घेवडा, 2 टेम्पो कोबी तर मध्य प्रदेशातून लसणाची 10 ते 12 ट्रक इतकी आवक झाली.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 1000 ते 1200 पोती, टोमॅटो 7 हजार 500 ते 8 हजार 500, फ्लॉवर 8 ते 10 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, ढोबळी मिरची 8 ते 10 टेम्पो, हिरवी मिरची 2 ते 3 टेम्पो, गवार 6 ते 7 टेम्पो, भेंडी 6 ते 7 टेम्पो, मटार 30 ते 40 गोणी, शेवगा 2 टेम्पो, गाजर 2 टेम्पो, तांबडा भोपळा 8 ते 10 टेम्पो, कांदा 70 ते 75 ट्रक यांसह इंदूर आणि आग्रा, इंदौर येथून बटाट्याची 50 ट्रक इतकी आवक झाली.

पावसाच्या तडाख्याने पालेभाज्यांचा दर्जा घसरला
पावसाचा फटका बसल्याने पालेभाज्यांचा दर्जा घसरला आहे. परिणामी, पालेभाज्यांच्या मागणीत घट होऊन त्याच्या भावातही जुडीमागे 5 ते 10 रुपयांनी घसरण झाली आहे. रविवारी बाजारात 1 लाख 50 हजार जुडी व मेथीची 50 हजार जुडी आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोथिंबिरीची आवक स्थिर राहिली तर मेथीची आवक 10 हजार जुड्यांनी घटली.

किरकोळ बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोथिंबीर, शेपू, करडई व मुळ्याच्या भावात जुडीमागे 10 रुपये तर पुदिना, अंबाडी व पालकच्या भावात जुडीमागे 5 रुपयांची घसरण झाली. रविवारी घाऊक बाजारात पालेभाज्यांच्या प्रतिजुडीचे भाव 6 ते 25 रुपये तर किरकोळ बाजारात 15 ते 30 रुपये इतके राहिले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news