मांडवगण फराटा: ‘कांद्याला आज ना उद्या भाव येईल’ या आशेवर अनेक शेतकर्यांनी वखारीत कांदा साठवला. मात्र, या आशा आता फोल ठरल्या आहेत. मांडवगण फराटा (ता. शिरूर) परिसरातील अनेक शेतकर्यांच्या वखारीतील लाखो रुपयांचा कांदा सडून गेला आहे.
सध्या शिरूरच्या पूर्व भागातील शेतकरी आपला कांदा मिळेल त्या भावात नाईलाजाने बाजारात विक्रीसाठी पाठवत आहेत. मात्र, हा भाव इतका कमी आहे की, खर्चाची भरपाईदेखील होत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. (Latest Pune News)
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले. मात्र, बाजारभाव घसरल्यामुळे काही शेतकर्यांनी तर कांदा रस्त्यावर किंवा शेतात टाकून दिला. त्यामुळे अनेकांनी पुढील वर्षी कांद्याची लागवड न करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा, वडगाव रासाई, सादलगाव, गणेगाव दुमाला, बाभुळसर बुद्रुक, इनामगाव, शिरसगाव काटा, तांदळी आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा साठवलेला आहे. शेतकरी किसन शंकर फराटे म्हणाले, ‘डोळ्यांदेखत वखारीत कांदा सडतो आहे. एवढे कष्ट घेऊनही मिळणार काही नाही, तर शेतकर्यांनी करायचं तरी काय?.
शेतकरी संभाजी फराटे इनामदार यांनी सांगितले की, ‘यंदा हजारो गोण्या वखारीत पडून आहेत. सुरुवातीपासूनच बाजारभाव मिळत नसल्याने विक्री थांबवली होती. आता सडू लागल्यावर उशीर झाला. थोडाफार बाजार वाढेल अशी आशा शेतकर्यांना लागून राहिली आहे. त्यासाठी सरकारने पाऊल उचलणे फार गरजेचे आहे.’
कांदा व्यापारी सचिन शितोळे म्हणाले, ‘सध्या सोलापूर, कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, कराड, बेंगळुरू, हैदराबाद या बाजारपेठांमध्येही कांद्याला समाधानकारक भाव मिळत नाही. दर केवळ 8 ते 15 रुपये प्रतिकिलो आहे, त्यामुळे शेतकर्यांचा खर्चही निघत नाही.’