नारायणगाव: जुन्नर तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड होते. सध्या अनेक शेतकर्यांनी उन्हाळ्यात घेतलेला कांदा बराखीत साठवून ठेवला असून, काही प्रमाणात शेतामध्ये उघड्यावर ठेवलेला कांदाही बाजारात विक्रीस येत आहे. मागील आठवडाभर कांद्याच्या बाजारभावात होत असलेल्या वाढीमुळे शेतकरीवर्गात समाधानाची भावना आहे.
आळेफाटा येथील बाजारात आज तब्बल 13 हजार पिशव्या कांद्याची आवक झाली. चांगल्या प्रतीच्या कांद्याला 20-21 रुपये प्रतिकिलो, तर मध्यम गुणवत्तेच्या कांद्याला 12-13 रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. (Latest Pune News)
पावसामुळे भिजलेला किंवा खराब कांदा देखील बाजारात विक्रीस येत आहे. बाजारभावात होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांनी साठवलेला कांदा निवडण्यास सुरुवात केली आहे. खराब कांदा बाजूला काढून चांगल्या गुणवत्तेचा कांदा विक्रीस आणण्यात येत आहे.
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा येथे मंगळवार, शुक्रवार व रविवार, तर ओतूर आणि जुन्नर येथील बाजारात गुरुवारी व रविवारी कांद्याचा लिलाव होतो. बाजारात चांगला दर मिळत असल्याने पारनेर, अकोले व संगमनेर तालुक्यातील शेतकरीही कांदा विक्रीस आणत आहेत.
अल्पदरात भोजन थाळीची मागणी
आळेफाटा येथे आठवड्यात तीन दिवस लिलाव होत असल्यामुळे येथे शेतकर्यांची मोठी उपस्थिती असते. येथे अल्पदरात भोजन थाळी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी दीर्घकाळापासून असूनही बाजार समितीकडून कोणतीही हालचाल झालेली नाही. त्यामुळे शेतकर्यांमध्ये नाराजी आहे.
कांदा लिलाव
दिनांक व ठिकाणे
आळेफाटा : मंगळवार, शुक्रवार, रविवार
ओतूर आणि जुन्नर : गुरुवार, रविवार
सध्याचा बाजारभाव चांगल्या प्रतीचा
कांदा : 20 ते 21 रुपये प्रतिकिलो
मध्यम प्रतीचा कांदा : 12 ते 13 रुपये प्रतिकिलो