जुन्नर : पुढारी वृत्तसेवा : गेल्या ऑक्टोबर महिन्यातील 26 तारखेला 60 रुपयांवर गेलेले कांद्याचे बाजार रविवारी (दि. 5) 40 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर लावण्यात आलेले 40 टक्क्यांचे शुल्क कमी केल्यानंतरही गेल्या 15 दिवसांपासून कांदा दरात घसरण सुरूच आहे. त्यातच राजस्थान, कर्नाटक आदी राज्यांसह कोल्हापूर परिसरात नवीन कांद्याला सुरुवात झाल्यामुळे बाजारात जुन्या कांद्याला मागणी कमी झाली आहे. तसेच केंद्र सरकारने उन्हाळ कांद्याला एमईपीची मर्यादा घातल्यामुळे दर घसरल्याचे व्यापार्यांचे मत आहे.
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात रविवारी कांद्याची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत निम्मीच झाली. गेल्या आठवड्यात कांद्याचे दर घसरल्यामुळे शेतकर्यांनी निवडक कांदा विक्रीस आणला नाही. या वेळी जुन्नरला 9 हजार 797 कांदा गोण्यांची आवक झाली, तर 720 बटाटा गोण्यांची आवक झाली, अशी माहिती बाजार समितीचे सभापती अॅड. संजय काळे यांनी दिली. बटाट्याला प्रतवारीनुसार प्रति 10 किलो 100 ते 150 रुपये असा दर मिळाला.
जुन्नर बाजारात गुरुवारी कांद्याला प्रति 10 किलोसाठी मिळालेला बाजारभाव रुपयांमध्ये पुढीलप्रमाणे : गोळा- 360 ते 400, सुपर कांदा नंबर 1- 350 ते 380, कांदा नंबर 2- 280 ते 330, गोल्टा/गोल्टी- 150 ते 300, बदला- 100 ते 270.
भाव घसरल्यामुळे शेतकरी अडचणीत
गेल्या पंधरवाड्यात कांदा दर 60 रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र, भाव पुन्हा घसरल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तर, व्यापार्यांना चढ्या भावांत खरेदी केलेला कांदा विकताना मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. 60 रुपये खरेदीचा कांदा नुकसान सोसून 40-45 रुपयांना विकल्याचे येथील व्यापारी सांगतात. दरम्यान, दिवाळीत काही बाजारपेठा बंद असल्यामुळे येत्या काही दिवसांत बाजारभाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.