

पुणे : ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे (वय ७८) यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. गुरुवारी त्यांच्यावर दुपारी दीडच्या सुमारास वैकुंठ स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संशोधन क्षेत्रासह राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अत्यंदर्शन घेतले.(Latest Pune News)
तत्पूर्वी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी गुरुवारी सकाळी भारत इतिहास संशोधक मंडळात ठेवण्यात आले होते, यावेळी पांडुरंग बलकवडे, माधव भंडारी, आ. भीमराव तापकीर, आ. हेमंत रासने, गो. ब. देगलूरकर, अविनाश सोहनी, राजा दीक्षित, राजेंद्र जोशी, कर्नल पराग मोडक, अनिल आठल्ये, केदार फाळके, डॉ सचिन जोशी, तेंडुलकर, पुरातत्व चे गोसावी, भुपाल पटवर्धन, साईनाथ बाबर, राजेंद्र जोशी, श्रीधर फडके यांच्यासह अनेकांनी अंत्यदर्शन घेतले.
त्यानंतर दुपारी सव्वाच्या सुमारास त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी वैकुंठ स्मशानभूमी येथे आणण्यात आले. यावेळी वैकुंठात राज्यमंत्री माधुरी मिसाळ, अभिनेता राहुल सोलापूरकर, प्रदीप रावत, राहुल नलावडे, रानडे इन्स्टिट्यूटचे संजय तांबट आणि संशोधन क्षेत्रातील मान्यवर अंत्यदर्शन घेतले.
गेली ५० वर्षे त्यांनी इतिहासाच्या संशोधन कार्याला वाहून घेतले होते. शिवचरित्र आणि युद्ध इतिहासाचे ते गाढे अभ्यासक होते. त्यांनी शिवचरित्रावर मराठी आणि इंग्लिशमध्ये खूप मोठे ग्रंथ लिहिले आहेत, जे आज इतिहास क्षेत्रामध्ये जगप्रसिद्ध आहेत. ते क्रियाशील संशोधक होते. फारसी, मोडी, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन अशा विविध भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. इतिहासातील सत्य आणि असत्य हे उघड करणं हा त्यांचा आवडता विषय होता.
सध्या ते इस्लामची ओळख आणि औरंगजेब या विषयावर संशोधन आणि लिखाण करत होते. १९७१ च्या युद्धात बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन्ही सीमेवर युद्ध पत्रकार म्हणून स्वतः हजर होते, आणि त्यांचा त्यावरही अभ्यास होता. ते मिलिटरी सायन्सचे द्विपदवीधर होते. त्यांचा अनेक भाषांवर आणि इतिहासातल्या लिप्यांचा अभ्यास होता.
त्यांनी शिवाजी झाला नसता तर, टिपू ॲज अ वॉर, शिवाजी लाईफ अँड टाईम, शिवचरित्र, मराठ्यांचे आरमार अशी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांचा भांडारकर संस्था, भारत इतिहास संशोधक मंडळ तसेच विविध संस्थांशी निकटचा संबंध होता. सध्या त्यांचे दुसऱ्या महायुद्धावरच्या पुस्तकाचे काम सुरू होते, ज्याची सुमारे पाच हजार पाने लिहून प्रकाशित होण्यासाठी तयार झालेली आहेत.