आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक कांदा साठवणूक; 2 लाख टन कांदा पडून

आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक कांदा साठवणूक; 2 लाख टन कांदा पडून

महाळुंगे पडवळ; पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या उत्तर व पूर्व भागात सुमारे 2 लाख टन कांदा साठवणूक करण्यात आला असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. आंबेगाव तालुक्यात घोड, वेळ नदी व हुतात्मा बाबू गेणू जलाशयाच्या (डिंभे) उजव्या डाव्या कालव्यामुळे बागायती क्षेत्र वाढलेले आहे. बारमाही पाणी उपलब्ध होत असल्याने रब्बी व उन्हाळी हंगामातील कांदा लागवड मोठ्या प्रमाणात यंदा करण्यात आली होती.

प्रतिकूल परिस्थितीत बदलत्या हवामानाचा अंदाज घेत मोठ्या प्रमाणात भांडवली खर्च करून खते, औषधांचा वापर करण्यात आला. कांदा काढणीच्या शेवटच्या टप्प्यात कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे कांद्याची फुगवण झाली नाही. त्यातच बाजारभाव अतिशय कमी असल्याने रणरणत्या उन्हात शेतकर्‍यांनी कांदाकाढणी केली. शेतात आरणी लावून ठेवण्यात आल्या होत्या.

दरम्यान अवकाळी पावसाने उघडीप दिल्याने कांद्याची प्रतवारी करून तो साठवणूक करण्याकडे सर्व शेतकर्‍यांचा कल दिसून येत आहे. आगामी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये कांद्याला अपेक्षित बाजारभाव मिळेल मग कांदा विक्रीसाठी बाजारपेठेत नेला जाईल, असे शेतकरी सांगत आहेत. केंद्र शासन व राज्य सरकार कांद्याच्या संदर्भात कोणतीही ठोस भूमिका घेत नाही. यामुळे शेतकर्‍यांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली आहे. एकीकडे वीज तोडणी सुरू आहे. त्यातच कांदा पिकाला बाजारभाव नाही. त्यामुळे शेतकर्‍याचे यंदा गणित बिघडणार, असे चित्र सर्वत्र दिसत आहे.

logo
Pudhari News
pudhari.news