ओतूर : कांदा बाजारभावात नडला, अखेर चाळीतच सडला

ओतूर : कांदा बाजारभावात नडला, अखेर चाळीतच सडला

ओतूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : माळशेज पट्ट्यात दरवर्षी दर्जेदार कांद्याचे उत्पादन होते. ओतूर बाजार समितीत हा कांदा विक्रीस येतो. मात्र, यंदा कांद्याच्या बाजारभावाने नीचांक गाठल्याने तो बहुतांश शेतक-यांनी चाळीत साठवला होता. मात्र, दुर्दैव असे की साठवलेला कांदाही चाळीतच सडला. परिणामी, कांदा भावातही नडला अन् चाळीतच सडला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

ओतूर आणि परिसर कांद्याचे आगर आहे. ओतूर कांदा म्हणून तो देशभर ओळखला जातो. पुणे फुरसुंगी,रांगडा कांदा असेही म्हटले जाते. दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कांदा असूनही यंदा बाजारभाव मिळालेच नाहीत. भविष्यातील भावाच्या आशेवर अनेकांनी कांद्याची साठवणूक केली. कनेसर बियाण्यांचा कांदा टिकवण क्षमतेला चांगला असल्याचे आतापर्यंत कांदा उत्पादकांनी अनुभवले आहे.

मात्र, यंदा अवकाळी पाऊस, खराब हवामान, अतिउष्णतेमुळे चाळीत साठवणूक करून ठेवलेला कांदा सडू लागल्याने शेतकरी चिंतीत झाला आहे. अगदी डिसेंबरपर्यंत टिकणारा कांदा यंदा मे महिन्यात चाळीतच सडू लागला. कांदा उत्पादकांपुढे अचानकच कांदा सडू लागल्याचे संकट उभे राहिल्याने शेतकरी हतबल झाला आहे. एप्रिल व मे च्या अतिउष्णतेमुळे कांदा खराब होऊ लागल्याने शेतकर्‍यांपुढे हे नवे संकट उभे
राहिले आहे.

कांदा उत्पादकांच्या राज्य सरकारपुढे मागण्या

हताश कांदा उत्पादकांनी सरकारपुढे अनेक मागण्या केल्या आहेत. चाळीत साठवणूक केलेल्या कांद्याला कमीत कमी पन्नास रुपये किलोला हमीभाव जाहीर करावा. फेब्रुवारी ते मार्च महिन्यांत विक्री केलेल्या कांद्याला किलोला 3.5 रुपये अनुदान जाहीर केले. मात्र, त्यानंतरही बाजारभाव नीचांकीच राहिल्याने एप्रिल व मे महिन्यांत विक्री झालेल्या कांद्याला कमीत कमी दहा रुपये किलोला अनुदान जाहीर करावे, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तुषार थोरात, माजी जि.प.सदस्य मोहित ढमाले, तुळशीराम शिंदे,शंकर ठोगिरे, प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news