आधुनिक तंत्राने मल्चिंग पेपरवर कांदा लागवड; शिरूर तालुक्यात केला प्रयोग

आधुनिक तंत्राने मल्चिंग पेपरवर कांदा लागवड; शिरूर तालुक्यात केला प्रयोग
Published on
Updated on

मांडवगण फराटा; पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्यात सध्या कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. पारंपरिक पद्धतीने कांदा लागवड करत असताना मांडवगण फराटा येथील उच्चशिक्षित युवक अक्षय दादासाहेब फराटे यांनी शेतीत आधुनिक तंत्रज्ञान वापरत कांदा लागवड केली आहे. याबाबत माहिती देताना बी. ई. सिव्हील झालेल्या फराटे यांनी सांगितले की, पारंपरिक व खर्चिक होणारी शेती व त्यातून होणारे नुकसान टाळण्यासाठी मल्चिंग पेपरवर दोन एकरवर कांदा लागवड केली.

यासाठी लागवड पूर्वमशागत नांगरणी, रोटोव्हेटर, काकर पाळी करून साडेचार फूट सरी काढण्यात आली. बेसल डोस खते बेडवर टाकून बेड सपाट करण्यात आला. त्यानंतर प्रत्येक सरी बेडवर ठिबक ड्रीप करण्यात आले. त्यानंतर मल्चिंग पेपरला छिद्र पाडून चार फुटांवर मजुरांच्या साहाय्याने लागवड करण्यात आली.

मल्चिंग पेपरवर पुढील 20 दिवस पाण्याचे नियोजन केले असून ड्रीपद्वारे विद्राव्य खते सोडली जाणार आहेत. चार इंचवर झालेली कांदा लागवड समांतर पद्धतीने करण्यात आल्याने लागवड खर्चात मोठी बचत झाली असून तणनाशक फवारणी केली जाणार नाही, तसेच खुरपणीचा ताणदेखील वाचला आहे. इतर कांदा लागवडीपेक्षा या लागवडीत औषध फवारणी, खते यांचा खर्चदेखील निम्म्यावर येणार आहे.

मल्चिंग पेपरवर लागवड झाल्याने एकरी 17 ते 20 टन कांदा उत्पन्न कमी कालावधीत निघेल, अशी आशा फराटे यांनी व्यक्त केली आहे. भविष्यात कमी जागेत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्यासाठी शेतीत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार असून विषमुक्त शेतीसाठी आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले. परिसरातील शेतकर्‍यांनीदेखील ठिबक व मल्चिंग पेपरचा वापर करून पिके घेणे हे काळाची गरज आहे, तरच शेती फायद्याची ठरणार असल्याचे फराटे यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news