

पारगाव: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात चोरट्यांचा उपद्रव सुरूच आहे. वळती येथील काटवानवस्तीत घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी एक लाख रुपयांची रोख रक्कम व सोन्या- चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना शुक्रवारी (दि. २७) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वळती गावाच्या पूर्वेला तीन किलोमीटर अंतरावर काटवान वस्ती आहे येथील नकुबाई जयराम भोर(वय वर्ष -८५) या वृद्ध महिला राहतात. गेली पंधरा दिवसांपासून त्या आजारी आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांची शेतजमीन करणाऱ्या दुसऱ्या शेतकऱ्याने त्यांना खंडाचे पैसे दिले होते. (Latest Pune News)
ते पैसे घरातच ठेवले होते नकुबाई भोर यांचा धाकटा मुलगा ज्ञानेश्वर जयराम भोर येथून जवळच असलेल्या भागडेश्वर चौकात राहतो.नकुबाई भोर या धाकट्या मुलाच्या घरी राहत होत्या. याचाच आज्ञात चोरट्यांनी फायदा घेत नकुबाई भोर यांच्या घराशेजारी राहणाऱ्या रामहरी कोंडीभाऊ भोर व त्यांचा थोरला मुलगा बबन जयराम भोर यांच्या घरांना कड्या लावल्या.
त्यानंतर चोरट्यांनी नकुबाई भोर यांच्या घराचे कडी कोयंडे- कटरच्या साह्याने तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले रोख एक लाख , व पाकिटात ठेवलेले पंधराशे रुपये, दीड तोळ्याची सोन्याची बोरमाळ, अर्धा तोळ्याची नथ, तीन तोळ्याच्या चांदीच्या मासोळ्या, असा एकूण ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
शनिवारी (दि.२८) सकाळी सहा वाजता बबन जयराम भोर यांनी शेजारी राहणारे शेतकरी रामहरी कोंडीभाऊ भोर यांना फोन करून घराला लावलेली कडी खोलण्यास सांगितले. परंतू त्यांच्याही घराला कडी लावली होती.
त्यानंतर त्यांनी गोविंद भोर यांना फोनवरून ही माहिती दिली. चोरीची घटना कळताच वळती गावचे पोलीस पाटील प्रकाश लोंढे पाटील यांनी मंचर पोलीस ठाण्यात घटनेची खबर दिली. मंचर पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार एस आर मांडवे, पोलीस कॉन्स्टेबल पी.एस. गवारी, एफ.ए. मोमीन यांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला.
वृद्ध व बंद घरे होतायत टार्गेट
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात चोऱ्यांचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. आठ दिवसांपूर्वी येथून जवळच असलेल्या काठापुर बुद्रुक येथील गणेश वस्तीत ज्ञानेश्वर जाधव व कमल जाधव या वृद्ध जोडप्याला चोरट्यांनी त्यांनी जबर मारहाण करत लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला होता.तसाच प्रकार पुन्हा वळती गावात घडला. वृद्ध महिला नकूबाई भोर या धाकट्या मुलाच्या घरी राहायला गेल्याने त्या सुदैवाने वाचल्या.