पारगाव: उन्हाळी भुईमुगाला अतिपावसाचा फटका बसल्याने उत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसत आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात सर्वत्र गावोगावी भुईमूग काढण्याची कामे जोरात सुरू आहेत. परंतु, पावसाचा फटका बसल्याने उत्पादनात मोठी घट झाल्याने भुईमूग उत्पादक शेतकर्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात उन्हाळी भुईमुगाचे पीक मोठ्या प्रमाणावर शेतकरी घेतात. यावर्षी देखील भुईमुगाचे पीक सर्वाधिक शेतकर्यांनी घेतले. सुरुवातीपासून विभाग पिकाला मुबलक प्रमाणात पाणी, स्वच्छ हवामान देखील मिळाले. परंतु, पीक अंतिम टप्प्यात आले असताना या परिसरात मान्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणात पडला. (Latest Pune News)
सलग एक महिना या परिसरात जोरदार पाऊस पडला. या पावसाचे पाणी भुईमुगाच्या शेतामध्ये साचून राहिल्याने जमिनीतील भुईमुगाच्या शेंगांच्या फुगवणीवर त्याचा परिणाम झाला. शेंगांची फुगवण झालीच नाही. शेंगांना सूर्यप्रकाश मिळाला नसल्याने शेंगांची परिपूर्ण वाढ झाली नाही. त्याचा परिणाम थेट उत्पादनावर झाला.
सध्या भुईमुगाच्या शेंगांना 10 किलोला 500 ते 550 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे. हा बाजारभाव चांगला असल्याचे भुईमूग उत्पादक शेतकरी सांगत आहेत. परंतु, उत्पादनात घट झाल्याने भुईमूग उत्पादक शेतकरीवर्गात नाराजी आहे.
शेंगा वाळविण्यासाठी हवे कडक ऊन
या परिसरात दररोजच पाऊस पडत आहे. त्यामुळे सूर्यप्रकाश देखील नसतो. भुईमुगाच्या शेंगा काढण्याची कामे सुरू आहेत. काढलेल्या शेंगांना ऊन देणे गरजेचे असते. परंतु, सध्या ऊन पडत नाही. त्यामुळे शेंगा वाळवण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.