

आळंदी: संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी अर्थात आळंदी देवस्थानला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या प्रती छपाईसाठी एक कोटी रुपये देणार असल्याची घोषणा उद्योग मंत्री तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आळंदी येथे केली.
याबरोबरच इंद्रायणी प्रदूषणात मुक्ती बाबत करण्यात आलेला लोणावळा ते तुळापूर पर्यंतचा संपूर्ण आराखडा एमआयडीसी मार्फत राबविला जाणार आहे आणि त्याच खात्याचा मी मंत्री असल्याने हे पुण्याचे काम माझ्या हातून होणार असल्याचे देखील सामंत यांनी यावेळी सांगितले. (latest pune news)
श्रीक्षेत्र आळंदी येथे सुरु असलेल्या संत श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याला सामंत यांनी भेट दिली.यावेळी त्यांनी भाविकांना संबोधित करत शासनाच्या निर्णयाची माहिती दिली.
यावेळी प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ,पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे,विश्वस्त ॲड.राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज कबीरबुवा, पुरुषोत्तम महाराज पाटील,माणिक महाराज मोरे,बापुसाहेब देहूकर ,माजी नगराध्यक्ष नंदकुमार कुऱ्हाडे,माजी विरोधी पक्षनेते डी.डी.भोसले पाटील,मुख्याधिकारी माधव खांडेकर,ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर,शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले,प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर,तुकाराम माने,माजी सभापती भगवान पोखरकर,शिवसेना शहर प्रमुख राहुल चव्हाण उपस्थित होते.
माऊलींच्या ज्ञानेश्वरी मुळेच मराठी भाषेला अभिजात दर्जा सिद्ध करणे शासनाला सोपे गेल्याचे सामंत यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. राज्यभरात विविध जिल्ह्यात माऊलींच्या जन्मोत्सवानिमित्ताने कीर्तन सप्ताह आयोजित करण्याबाबत यजमानपद स्वीकारण्याचा देखील त्यांनी यावेळी प्रस्ताव ठेवला.