

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वाघोली परिसरात भरारी पथकाने छापा टाकून मे. रोहन स्टोन क्रशरची वीजचोरी उघडकीस आणली आहे. या औद्योगिक ग्राहकाचा 103 एच.पी. जोडभार असताना त्यांनी ट्रान्सफॉर्मर डिस्ट्रीब्युशन बॉक्समधून अतिरिक्त एल. टी. केबल टाकून मीटर बायपास करून वीजचोरी केल्याचे तपासात उघड झाले. या ग्राहकाने चार लाख 25 हजार 72 युनिटची चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला 74 लाख, 88 हजार 670 रुपयांचे वीजचोरीचे बिल देण्यात आले आहे.
दुसर्या घटनेत वाघोली परिसरातील मे. पृथ्वीराज एन्टरप्रायजेस स्टोन क्रशरने वीजचोरी केल्याचे उघडकीस आले आहे. 95 एच.पी. जोडभार असलेल्या औद्योगिक ग्राहकाने ट्रान्सफॉर्मर डिस्ट्रीब्युशन बॉक्समधून अतिरिक्त एल. टी. केबल टाकून मीटर बायपास करून वीजचोरी केल्याचे तपासात आढळून आले. या ग्राहकाने तीन लाख 55 हजार 354 युनिटची चोरी केल्याचे निष्पन्न झाले असून, यासाठी त्याला 69 लाख 67 हजार 500 रुपयांचे वीजचोरीचे बिल देण्यात आले आहे.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी वीजचोरी शोध मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक प्रमोद शेवाळे व पुणे प्रादेशिक विभागाचे उपसंचालक सुमित कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता विशाल कोष्टी, सहा. सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी सोनाली बावस्कर व तंत्रज्ञ पवन चव्हाण यांनी मोहीम यशस्वी केली.