

पुणे: राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा उत्सव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू असून, गणेशोत्सवाला युनेस्कोचा सांस्कृतिक दर्जा मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे. हा प्रस्ताव यशस्वी होण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी व्यक्त केले.
गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार हेमंत रासने, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. (Latest Pune News)
शेलार म्हणाले, गणेशोत्सवातील देखाव्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील प्रसंग, ऑपरेशन सिंदूर, स्वदेशी वस्तू वापर, युनेस्कोच्या वारसा यादीतील 12 गडकिल्ले, पर्यावरण आदी विषयांवर जनजागृती करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. यंदा गणेशोत्सवासाठी रात्री 12 वाजेपर्यंत 7 दिवस ध्वनीक्षेपकांच्या वापरास जिल्हाधिकार्यांनी परवानगी दिली आहे. याबाबत प्रशासनाने गणेश मंडळे आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्यावा.
गणेशोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले असून, शासकीय इमारती व वारसास्थळांवर या बोधचिन्हाची रोषणाई करण्यासोबतच महत्त्वाच्या चौकांचे सुशोभीकरण करून रोषणाई करावी. त्यासाठी जिल्हा प्रशासन, महापालिका, पीएमआरडीए, पोलिस व महावितरण यांनी प्रत्येकी पाच चौकांची जबाबदारी घ्यावी, असे निर्देश देण्यात आले.
ऑपरेशन सिंदूर व स्वदेशीविषयी जनजागृती करावी
या वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भारताने जगासमोर ऑपरेशन सिंदूरद्वारे दाखविलेली शक्ती आणि स्वदेशी वस्तूंच्या वापराविषयी जनजागृती करावी. स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करून त्यांच्या कर्तृत्वावर आधारित माहितीफलक लावावेत. तसेच, मंडळांनी प्रशासनाशी समन्वय साधून हा गणेशोत्सव शांतता व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करावा, असे आवाहन शेलार यांनी केले.
काय म्हणाले सांस्कृतिक कार्यमंत्री?
विसर्जन मार्गावर ड्रोन शोचे आयोजन, जाहिरात फलकांवर सामाजिक संदेश द्यावेत
परदेशी विद्यार्थी व नागरिकांना उत्सवाशी जोडावे
सांस्कृतिक विषयांचे जतन व संवर्धन करण्यासाठी तालुका व जिल्हास्तरावर विविध स्पर्धा भरवा
मराठी संस्कृती, कलाकार आणि परंपरांना प्रोत्साहन देण्यासाठी नाट्यमहोत्सव आयोजित करा
व्याख्यानमाला, चित्रकला व निबंध स्पर्धांचे आयोजन करावे