

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मोटार वाहन कायद्यातील तरतुदींची पूर्तता होत नसल्यामुळे पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने पुण्यात अॅपद्वारे रिक्षा प्रवासी वाहतूक करणार्या कंपन्यांचा परवाना नाकारला आहे. यामुळे आता पुण्यात रिक्षाचालकांना अॅपद्वारे रिक्षातून प्रवासी वाहतूक करता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे पुण्यात अॅपद्वारे वाहतूक करण्यासाठी चार कंपन्यांनी चारचाकी आणि तीनचाकी प्रवासी वाहतुकीचा अॅग्रीगेटर परवाना मिळावा यासाठी अर्ज केले होते.
त्या अर्जावर मागील दोन आठवड्यांपासून पुणे आरटीओअंतर्गत सुनावणी सुरू होती. परवान्याकरता मे. अॅनी टेक्नॉलॉजीज प्रा.लि., मे. किव्होल्युशन टेक्नॉलॉजीज प्रा.लि., मे. उबेर इंडिया सिस्टीम्स प्रा.लि., मे. रोपन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस प्रा.लि. यांनी अर्ज केले होते. मात्र, प्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक असलेले मोटर वाहन कायद्यातील नियमांची पूर्तता या कंपन्यांकडून होऊ शकली नाही. त्यामुळे या चार कंपन्यांचे अर्ज प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने नाकारले, असे आरटीओकडून सांगण्यात आले आहे.
न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मे. अॅनी टेक्नॉलॉजीज प्रा.लि. व मे. उबेर इंडिया सिस्टीम्स प्रा.लि. यांना चारचाकी हलकी मोटार वाहने संवर्गाकरिता अॅग्रीगेटर लायसन्स जारी करण्याबाबत शासनाकडून मार्गदर्शन घेण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला. तसेच या चारही अर्जदारांनी ऑटोरिक्षा वाहनांकरिता अॅग्रीगेटर लायसन्स मिळण्यासाठी अर्ज केले होते. मात्र, ऑटोरिक्षा संवर्गाकरिताच्या अर्जावर अॅग्रीगेटर लायसन्स नाकारण्याचा निर्णय घेतला आहे.
– डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.आरटीओ अॅप रिक्षा प्रवाशी वाहतूक बंद करण्याचा आव आणत आहे. यापूर्वी ओला, उबेरची बेकायदेशीर रिक्षा वाहतूक सुरू होती. आता अॅग्रीगेटर पॉलिसी काढली आहे. चांगली सेवा देण्यासाठी तंत्रज्ञान हे गरजेचेच आहे. – नितीन पवार