

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_date" view="circles" /]
पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेची रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये शहरातील हजारो नागरिक दररोज उपचारांसाठी येतात. दवाखान्यांमधील पायाभूत सुविधा, स्वच्छता, मनुष्यबळ आदी 19 निकषांवर आधारित त्रुटी भरून काढण्यात येणार आहेत. त्यासाठी आरोग्य विभागातील अधिकार्यांना प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेची रुग्णालये, प्रसूतीगृहे आणि दवाखान्यांमध्ये पायाभूत सुविधा मजबूत करण्याचा निर्णय आरोग्य विभागातर्फे घेण्यात आला आहे.
त्यासाठी सर्व आरोग्य अधिकारी सुविधांची तपासणी करून दर शुक्रवारी साप्ताहिक अहवाल आरोग्यप्रमुखांना सादर करणार आहेत. तपासणीसाठी 19 निकषांची चेकलिस्ट तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये पायाभूत सुविधा, बाह्य सुविधा, फार्मसी, विशेष ओपीडी, लसीकरण कक्ष, पोर्टल अपलोडिंग, स्टोअर रूम यांसारख्या बाबींचा समावेश आहे. आरोग्यप्रमुख डॉ. भगवान पवार यांनी वॉर्ड वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सहायक आरोग्य अधिकारी आणि झोनल वैद्यकीय अधिकार्यांना आरोग्य सुविधांच्या ठिकाणी भेटी देऊन तपासणी करण्यास सांगितले आहे.
महापालिकेची रुग्णालये आणि दवाखान्यांना अचानक भेटी दिल्या असता, काही रुग्णालयांमध्ये किरकोळ समस्या आढळून आल्या. महापालिकेकडे पायाभूत सुविधा, पात्र कर्मचारी आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणे आहेत. तरीही, नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. तक्रारी सोडवण्यासाठी त्रुटी तातडीने भरून काढल्या जाणार आहेत. त्यासाठी चेकलिस्ट तयार करून पाहणीला सुरुवात करण्यात आली आहे. आमच्या रुग्णालयांमधून ससूनमध्ये रवानगी कमी करण्यावरही लक्ष केंद्रित केले आहे.
– डॉ. भगवान पवार, आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका
कोणत्या सुविधांची होणार तपासणी?
कर्मचारी, सुरक्षारक्षकांची संख्या, उपलब्धता
दवाखान्यांची, स्वच्छतागृहांची स्वच्छता
पिण्याचे पाणी, जनरेटर बॅकअप,
टेलिकन्सलटेशन, योग्य वेंटिलेशन, लाईट
जन्म आणि मृत्यू दाखला प्रक्रिया
ड्रेसिंग रूम, स्टोअर रूम, फॅमिली प्लॅनिंग रूम
लसीकरण केंद्रे, प्रयोगशाळा, औषधांची सुविधा