पुणे : कोथरूड परिसरात दहशतवादी पकडणाऱ्या पुणे पोलीस दलातील तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना व पुढे तपास पुणे दहशतवादी विरोधी पथकाकडे गेल्यानंतर मोठी साखळी ब्रेक करणाऱ्या अधिकाऱ्यांना आज (दि.३१) केंद्रीय गृहमंत्र्यांचे दक्षता पदक जाहीर करण्यात आले. तत्कालिन कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत चंद्रकांत पाटील तसेच दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस अधीक्षक जयंत मीना, सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र गवारी, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील चव्हाण आणि सहायक पोलिस चंद्रकांत लोहकरे यांचा हे पदक देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
प्रमुख संशयितांमध्ये मोहम्मद शहानवाझ आलम, रिजवान अली, अब्दुलाह शेख आणि तलाह लियाकत खान, मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान ऊर्फ मटका ऊर्फ अमीर अब्दुल हमिद खान (रा. रतलाम मध्यप्रदेश), मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी ऊर्फ अदिल ऊर्फ अदिल सलीम खान (रा. रतलाम, मध्यप्रदेश), कादीर दस्तगिर पठाण ऊर्फ अब्दुल कादीर (रा. कोंढवा, पुणे), समीब नासीरउद्दीन काझी (रा. कोंढवा पुणे), जुल्फीकार अली बडोदवाला ऊर्फ लालाभाई ऊर्फ लाला ऊर्फ सईफ, शमिल साकिब नाचन आणि आकिफ अतिक नाचन (रा. तिघेही रा. पडघा, ठाणे) यांचा समावेश आहे. या सर्व संशयितांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
सध्या ठाणे पोलीस आयुक्तालया अंतर्गत राबोडी पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले हेमंत चंद्रकांत पाटील हे जुलै २०२३ मध्ये पुणे आयुक्तालयाअंतर्गत कोथरुड पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणुन कर्तव्य बजावित होते. त्यावेळी पुणे शहर बिट मार्शलवरील पोलिस अमंलदार हे हद्दीमध्ये गस्त घालत असताना त्यांनी तिघांना दुचाकी चोरताना पकडले होते. पुढे हे तिघेही दहशतवादी असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्यांचा संबंध इसिस या दहशतवादी संघटनेशी असल्याचे निष्पन्न झाले. पकडलेल्या तिघांपैकी एक जण कोंढाव्यातून पळून गेला होता. पुढे या प्रकरणाची लिंक ही आंतराष्ट्रीय पातळीवर असल्याने या प्रकरणाचा तपास पुणे एटीएस आणि एनआयए करत होती. पुढे पुणे एटीएसच्या अधिकाऱ्यांमुळे पडघा येथील मोठी दहशतवादाची लिंक मिळाली. दहशतवादी कारवाईसाठी पूरक असे पुरावेही तपास यंत्रणांच्या हाती लागले. या दहशतवाद्यांनी पुणे सातारा, कोल्हापुरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याची तसेच त्यांनी घातपातासाठी आवश्यक असलेले सर्व प्रकारचे प्रशिक्षण घेतल्याची माहिती तपासात उघड झाली होती.
पकडण्यात आलेले सर्व दहशतवादी इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांनी पुण्यात आणि महाराष्ट्रात मोठे दहशतवादी कृत्य करण्याचा कट आखल्याचेही एनआयएने केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे.
पकडण्यात आलेले दहशतवादी विदेशात बसलेल्या हँडलरच्या सिक्रेट अॅपद्वारे संपर्कात असल्याचेही तपासात समोर आले आहे. त्यांनी दरोडे, चोऱ्या करून दहशतवादी कृत्यासाठी निधी उभा केल्याचे व त्यांनी हँडलर कडून देखील पैसे घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. हे दहशतवाद्यांनी आयईडी (इम्प्रूव्हाईस एक्स्पोझीव्ह डिव्हाईस) म्हणजेच बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण कोंढव्यात घेतले होते. त्या आधारे त्यांनी जंगलात रेकी करून नियंत्रित स्फोटाच्या चाचण्या देखील घडवून आणल्या होत्या. त्यांचा महाराष्ट्रातील तसेच गुजरात मधील मेट्रोसिटीमध्ये स्फोट घडवून आणण्याचा देखील मानस होता. त्यांनी दहशतवादी कारवाईसाठी शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण देखील घेतल्याचे एनआएच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांनी त्यांचा परदेशातील इसिसचा दहशतवादी हँडलर खलिफा याच्याकडून इसिसशी संबंधित शपथ घेतली असल्याचे निष्पन्न झाले होते.
पुण्यातील कोथरूड येथून तिघांना झाली अटक
राजस्थान येथील चित्तोरगड येथील स्फोटके बाळगल्याचा गुन्ह्यात सहभाग
बंदी घातलेल्या अलसुफा संघटनेशी संबंध
मोहम्मद आलम झाला होता फरार
दहशतवाद्यांकडे आईडी, पिस्तुल आणि दारूगोळा देखील सापडला
फरार दहशतवाद्यांना आश्रय देण्याबरोबर त्यांना इम्प्रुव्हाईज एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस (आईडी) तयार करण्यासाठी पूर्व तयारी
आरोपींच्या तपासात त्यांनी दहशवाद्यांसाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केल्याचे उघड
बॉम्बस्फोट केल्यानंतर अटक टाळण्याची देखील योजना त्यांनी आखली
अटकेपासून वाचण्यासाठी त्यांनी दुर्गम जंगलात लपण्याचा देखील प्लॅन
जंगलात लपण्यासाठी त्यांनी ड्रोनद्वारे ती जंगलातील ठिकाणे देखील शोधली
दहशतवादी कृत्यासाठी त्यांना भारतातून तसेच परदेशातून वित्तपुरवठा
भारताची सुरक्षा, अखंडता आणि सार्वभौमत्वाला धोका पोहचविण्याचा उद्देश
भारतीय भुमीवर दहशतवादी कारवाया करण्याचा त्यांचा हेतू
महाराष्ट्र, गोवा, तेलंगणासह इतर राज्यामध्ये इसिसचा प्रसार करण्यासाठी रेकी