पुणे-मुंबई रस्ता कासवगतीनेच ! वाहतूक पोलिसांचे लक्ष केवळ पावत्या फाडण्याकडेच

रस्त्यावर विक्रेत्यांचे अतिक्रमण
pune mumbai road
पुणे-मुंबई रस्ताPudhari
Published on
Updated on

हिरा सरवदे

भूसंपादनाअभावी सहा वर्षे रखडलेल्या खडकी कॅन्टोन्मेंट हद्दीतील जुन्या पुणे-मुंबई रस्त्याच्या रुंदीकरणाचे महापालिकेने हाती घेतलेले काम कासवगतीने सुरू आहे. त्यातच रस्त्याच्या कडेला फळे आणि इतर वस्तूंची विक्री करणार्‍यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासाठी जुना मुंबई-पुणे महामार्ग हा महत्त्वाचा रस्ता आहे. पिंपरी हद्दीत दापोडीपर्यंत रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले. परंतु, पुणे महापालिका हद्दीत खडकी कॅन्टोन्मेंटच्या हद्दीमध्ये भूसंपादनाअभावी 2.1 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण होऊ शकले नव्हते. हा रस्ता अंडी उबवणी केंद्रापासून ते संत तुकाराम महाराज पुलापर्यंत (हॅरिस ब्रीज) 42 मीटर रुंदीचा रस्ता अपेक्षित आहे. त्यानुसार महापालिकेने 2016 मध्ये निविदा प्रक्रिया राबविली होती. या रस्त्याच्या कडेला बोपोडीत राहाणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन करण्यात आले. परंतु, खडकी रेल्वे स्टेशनपासून रेंजहिल्स चौकापर्यंत रस्त्याच्या कडेची जागा संरक्षण विभागाकडून मिळत नव्हती.

त्यामुळे रस्ता रुंदीकरण रखडले होते. परिणामी, येथील 21 मीटर रुंदीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. सहा वर्षांनंतर एप्रिल 2022 मध्ये लष्कराने रस्त्याची जागा महापालिकेच्या ताब्यात दिली. महापालिकेने रुंदीकरणासाठी निविदा काढून नोव्हेंबर 2022 मध्ये कामही हाती घेतले. स. नं. 105 येथील पंजाब हॉटेल आणि जयहिंद चित्रपटगृहाची जागाही महापालिकेच्या ताब्यात आल्याने रस्ता रुंदीकरणाचे सर्वच अडथळे दूर झाले आहेत. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचे काम गतीने होणे अपेक्षित होते. काम पूर्ण करण्यासाठी दिलेली मुदत दीड महिन्याने संपत आहे. मात्र, अद्यापही अनेक ठिकाणी कामे अर्धवटच आहेत. रस्ता दुभाजक, पदपथ, साइडपट्ट्या आदी कामे होणे बाकी आहे.

सध्याचा कामाचा वेग पाहता ही सर्व कामे पुढील दीड महिन्यात पूर्ण होण्याची थोडीही शक्यता नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने मार्चपर्यंत काम करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी केल्याचे पथ विभागातील अधिकार्‍यांनी सांगितले.

वाहतुकीला अडसर

रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने जेसीबी व इतर वाहने उभी असतात. रस्त्यावर जागोजागी सिमेंट ब्लॉक, रस्ता दुभाजकाचे साहित्य आहे. असे असताना अस्तित्वात असलेल्या रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची फळे, कव्हर, कपडे, बेडशीट, लोड, टोप्या, गॉगल, खेळणी, टेडीबेअर आदी विक्रेते अतिक्रमण करून आपले व्यवसाय थाटतात. हे व्यावसायिक हातांमध्ये फळे व कर्णकर्कश स्पीकर घेऊन रस्त्यावर उभे राहतात. या वस्तू घेण्यासाठी वाहनचालक आपल्या गाड्या थांबवतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.

पोलिस असतात सावजांच्या शोधात

पोल्ट्री चौक, चर्च चौक आणि इतर चौकांमध्ये वाहतुकीच्या नियमनासाठी तैनात केलेल्या वाहतूक पोलिसांचे लक्ष रस्त्यावरील व चौकातील वाहतुकीपेक्षा वाहनचालकांकडून दंडाच्या पावत्या फाडण्याकडेच जास्त असल्याचे चित्र पाहायला मिळते. या रस्त्यावरून बरीच अवजड वाहनेही ये-जा करतात, त्यामुळे पोलिस सावज शोधण्यातच व्यस्त असल्याचे पाहायला मिळते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news