

पुणे; पुढारी वृत्तसेवा : आर्थिक वर्षात 1 हजार 524 कोटींचा महसूल मिळवून पुणे आरटीओ कार्यालय राज्यात अव्वल स्थानी आले आहे. तर पुणे विभागाला एकूण 2 हजार 835 कोटी रूपयांचा महसूल मिळाला आहे. आरटीओ कार्यालयांतर्गत वाहनांसदर्भातील सर्व प्रकारची कामे केली जातात. राज्यभरात आरटीओची 50 पेक्षा अधिक कार्यालये आहेत.
या सर्व कार्यालयांमध्ये सर्वाधिक महसूल प्राप्त करण्यात पुणे आरटीओ आघाडीवर आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात 1377.30 कोटी रूपयांचा महसूल मिळविण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, प्रत्यक्षात पुणे आरटीओने 1524.24 कोटींचा महसूल मिळविला आहे. यामुळे यंदा महसूलात 42.05 कोटींची वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. पुणे आरटीओ कार्यालयासह पिंपरी-चिंचवड कार्यालयाच्या आर्थिक वर्षातील महसूलात 40.83 कोटीने वाढ झाली आहे. बारामती कार्यालयाच्या उत्पन्नात 68.89 कोटींची, सोलापूर कार्यालयाच्या उत्पन्नात 38.03 कोटी, तर अकलूज कार्यालयाच्या उत्पन्नात 36.62 कोटीने वाढ झाली आहे. विभागाच्या एकूण उत्पन्नात 42.50 कोटीने वाढ झाली आहे.
कार्यालय – महसूल (कोटींमध्ये)
पुणे कार्यालय – 1524.24
पिंपरी-चिंचवड- 874.71
बारामती – 160.26
सोलापूर – 196.59
अकलूज – 79.46
एकूण पुणे विभाग – 2835.26
महसूल मिळविण्यात पुणे विभाग राज्यात अव्वल स्थानी आहे. कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचार्यांच्या अथक प्रयत्नांमुळे पुणे आरटीओ राज्यातील अव्वल क्रमांकावर आहे.
डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे