दिवे परिसरातील रिंगरोडच्या मोजणीला विरोध

दिवे परिसरातील रिंगरोडच्या मोजणीला विरोध

दिवे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पुणे शहरालगतच्या गावांत नागरीकरण झपाट्याने वाढू लागले. जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. परंतु, विकासाच्या दृष्टीने लगतची ही गावे वंचित राहिली आहेत. अशातच पुणे महानगर प्राधिकरणाची स्थापना झाली आणि इथल्या नागरिकांना विकासाची आस लागली. असे असतानाच परिसरातून रिंगरोड प्रस्तावित झाला. मात्र, रिंगरोड एकीकडे आणि शिक्के दुसरीकडे, अशी स्थिती असल्याने शेतकर्‍यांनी याला प्रखर विरोध केला आहे. पुणे शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी पीएमआरडीएने चक्राकार मार्ग निश्चित केला. या मार्गाची रुंदी 110 मीटर निश्चित करण्यात आली. यात अनेक अल्पभूधारक शेतकरी नामशेष होणार आहेत, तर काही शेतकर्‍यांनी पिढ्यान् पिढ्या जपलेल्या अंजीर तसेच सीताफळ यांच्या बागा नामशेष होणार आहेत.

चक्राकार मार्ग पूर्णत: बागायती पट्ट्यातून जात असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. अलीकडे या मार्गासाठी लागणार्‍या जमिनीच्या भूसंपादन प्रक्रियेने वेग घेतला आहे. त्यामुळे या मार्गाला शेतकरी प्रखर विरोध करीत आहेत. यासाठी शेतकर्‍यांनी संघटना स्थापन करून सासवड प्रांताधिकारी कार्यालय येथे चक्री उपोषणदेखील केले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चादेखील काढला. परंतु, अद्यापही ठोस निर्णय झालेला नाही. शेतकर्‍यांनी गावागावांत या रस्त्याच्या मोजणीला यापूर्वीच विरोध केला आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आपल्या जमिनी वाचविण्यासाठी शेतकर्‍यांचा जीव टांगणीला लागला आहे.

आता पुन्हा एकदा 26 ऑगस्ट रोजी मोजणी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. परंतु, रिंगरोड ज्या ठिकाणावरून निश्चित करण्यात आला आहे, त्याच्या अगदी अर्ध्या किलोमीटर अंतरावरील जमिनीच्या सातबार्‍यावर रिंगरोडचे शिक्के मारण्यात आले आहेत. हे गौडबंगाल काही केल्या शेतकर्‍यांना सुटेनासे झाले आहे. एवढ्या अंतरावरील सातबार्‍यावर जर शिक्के मारले, तर मग आमचे गाव शिल्लक ठेवता की नाही? असा सवाल शेतकरी विचारत आहेत. जर चुकून हे शिक्के मारले गेले असतील, तर प्रथम हे अनधिकृत शिक्के काढा; मगच मोजणी करा, असा पवित्रा शेतकर्‍यांनी घेतला आहे.

याबाबत महसूल विभागाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे आगामी काळात होणार्‍या मोजणीला शेतकर्‍यांचा प्रखर विरोध आहे. एकदा मोजणी झाल्यानंतर आमचे शिक्के काढण्यासाठी आम्हालाच हेलपाटे मारावे लागणार आहेत. त्यामुळे आधी शिक्के काढल्याशिवाय आम्ही मोजणी होऊ देणार नाही, असे हरिभाऊ झेंडे व संदीप झेंडे या शेतकर्‍यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news