’मेरी माटी मेरा देश’नुसार आज शपथ

’मेरी माटी मेरा देश’नुसार आज शपथ

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या सांगता सोहळ्यानिमित्ताने जिल्ह्यात 9 ते 14 ऑगस्ट या कालावधीत 'मेरी माटी मेरा देश' उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात बुधवारी सकाळी 10 वाजता पंचप्रण शपथ घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत. 'मेरी माटी मेरा देश' उपक्रमांतर्गत शिलाफलकम, वसुधा वंदन, स्वातंत्र्य सैनिक वीरांना वंदन, पंच प्रण शपथ, ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. वसुधावंदन उपक्रमासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर 75 वृक्षांची लागवड करून अमृत वाटिका तयार करण्यात यावी. अमृत सरोवर, पाणीसाठ्याचे ठिकाण, ग्रामपंचायत किंवा शाळेच्या परिसरात अमृत वाटिका तयार करण्यात यावी. वृक्ष लागवड महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करण्यात यावी.

शालेय प्रांगणात मातृभूमीची सुरक्षा आणि तिच्या गौरवाच्या रक्षणाकरिता वीरांनी दिलेल्या बलिदानाची माहिती जनतेला मिळावी, यासाठी शीलाफलक तयार करण्यात यावा. शीलाफलकावर वीरांची नावे देण्यात यावी. ग्रामसभेत जनजागृती करून या उपक्रमाची माहिती देण्यात यावी. देशासाठी, स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलिदान केलेल्या स्थानिक सराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रातील लष्कर किंवा पोलिस दलातील निवृत्त अधिकारी-कर्मचारी, स्वातंत्र्यसैनिक यांच्या परिवारातील सदस्यांचा सन्मान करण्यात यावा.

पंचप्रण शपथ घेण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून तयार केलेल्या मातीच्या दिव्यांची पुरेशी व्यवस्था करण्यात यावी, असे दिवे बचत गटाच्या माध्यमातून शिधावाटप दुकानात उपलब्ध करून देण्यात यावेत. मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत 'घरोघरी तिरंगा' हा उपक्रम राबविण्यात येऊन प्रत्येक घरी राष्ट्रध्वज फडकविण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात यावे. यादरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीतील एक मूठ माती समन्वयक अधिकार्‍याकडे सोपविण्यात यावी, अशा सूचनाही जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.

आम्ही शपथ घेतो की…
आम्ही शपथ घेतो की, भारतास 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू. गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू. देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू. भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणार्‍यांप्रती सन्मान बाळगू. देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news