

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पैसे जमवून नागरिक स्वप्नातील वाहन खरेदी करतात. त्यानंतर बर्याच जणांना आवडीचा पसंतीचा वाहन क्रमांक हवा असतो. काही पैसेवाली मंडळी तर पसंतीच्या क्रमांकासाठी लाखो रुपये खर्च करायला तयार असतात. यामध्ये राजकीय मंडळी, चित्रपट क्षेत्रातील कलाकार आणि व्यावसायिक मंडळी पसंती क्रमांकासाठी धावपळ करतात. यासाठी आतापर्यंत आरटीओ कार्यालयात फेर्या माराव्या लागत होत्या. मात्र, आता ऑनलाईनद्वारे घरबसल्या पसंतीचा क्रमांक मिळण्याची सुविधा आरटीओ सुरू करणार आहे.
वाहन क्रमांकाची मालिका आणि परिवहन संकेतस्थळाचे सॉफ्टवेअर यांच्या जोडणीचे काम पूर्ण झाले आहे. सध्या प्राथमिक स्तरावर आरटीओ कार्यालयात या सेवेची चाचणी सुरू असून त्यानंतर आरटीओच्या एका विभागात प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरू केली जाणार आहे. यातील त्रुटी दूर केल्यानंतर राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयात ही सेवा सुरू केली जाणार आहे. यासाठी परिवहन आयुक्तालयाने प्रस्ताव तयार केला असून, हा प्रस्ताव मंजूर झाल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पायर्या झिजवण्याच्या त्रासातून वाहनधारकांची कायमची सुटका होणार आहे.
नवीन नंबरच्या मालिकेची जाहिरात आरटीओकडून प्रसिद्ध झाल्यानंतर वाहन चालकाला आरटीओ कार्यालयात येऊन डीडीद्वारे पैसे भरावे लागत होते. यानंतर एकाच नंबरसाठी एकापेक्षा जादा अर्ज आल्यास आरटीओ कार्यालयात लिलाव प्रक्रिया होऊन जास्त बोली लावणार्याला तो नंबर दिला जातो; परंतु आता नवीन नंबरची मालिका सुरू झाल्यानंतर नागरिकांना ऑनलाइन पैसे भरता येणार आहेत. एकाच नंबरसाठी जादा अर्ज आल्यास ऑनलाइनच लिलाव होणार असून जादा पैसे देणार्याला तो नंबर दिला जाणार आहे.
हेही वाचा