

पुणे: लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांची नागरी सहकारी पतसंस्था नोंदविण्याबाबतच्या परिपत्रकीय सूचना सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी सर्व विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधकांना दिलेल्या आहेत.
याबाबत महिला सहकारी पतसंस्थांचे सभासद होणार्या लाभार्थी सभासद महिलांची यादी महिला व बालविकास विभागाकडून प्रमाणित करून घेण्यात येणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात राज्यात महिलांच्या पतसंस्थांचे जाळे वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. (Latest Pune News)
महिला व बालविकास विभागाच्या सचिवांची सहकार आयुक्तालयाबरोबर 9 जून 2025 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे महत्त्वपूर्ण बैठक झाली. बैठकीतील चर्चेनुसार लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी, योजनेतील सहभागी महिलांची महिला नागरी सहकारी पतसंस्था नोंदणी करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
महिलांची जिल्ह्यांतर्गत नागरी सहकारी पतसंस्था नोंदविण्याबाबत सहकार आयुक्तालयाने यापूर्वीच म्हणजे 8 मार्च 2019 रोजी परिपत्रक जारी केले आहे. त्या परिपत्रकातील नोंदणी निकष आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियिम 1960 व त्याखालील नियम 1961 मधील संस्था नोंदणीबाबत तरतुदींचे पालन करण्यात यावे.
‘पालक अधिकारी’ म्हणून सहायक निबंधकांची नियुक्ती होणार
पतसंस्था नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी व नोंदणीनंतर पतसंस्था योग्यप्रकारे चालविण्यासाठी मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने प्रत्येक पतसंस्थेसाठी सहकार विभागातील सहायक निबंधक दर्जाचा अधिकारी यांची ‘पालक अधिकारी’ म्हणून नियुक्ती करावी तसेच पालक अधिकार्यांना पतसंस्थांना हिशेबलेखन, संस्था व्यवस्थापन, ठेवी स्वीकारणे, कर्जवाटप करणे, संचालक मंडळ सभांना व वार्षिक सभा इतिवृत्तलेखन, लेखापरीक्षण तसेच कायदेशीर बाबींसंदर्भात योग्य ते मार्गदर्शन करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत.