पुणे: वयाची 80 वर्षे पूर्ण करत असतानाही तुकाराम रामा केंद्रे आणि त्यांच्या जीवनसाथी बारकाबाई केंद्रे गेल्या 50 वर्षांपासून हातात भगव्या पताका, डोक्यावर टोपली आणि मुखी विठ्ठलनाम घेऊन दरवर्षी आषाढी वारीला पंढरपूरच्या दिशेने निघतात. शिक्षण नाही; पण श्रद्धा अफाट आहे.
‘आमच्या काळात शिक्षण नव्हतं, शाळेत जाऊ दिलं नाही,‘ असे बारकाबाई सांगतात. पण, त्यांचे जीवन शाळेच्या पाठ्यपुस्तकांपेक्षा मोठे विद्यापीठ आहे; जिथे विश्वास, श्रद्धा, कष्ट आणि समाधान हे विषय आहेत. (Latest Pune News)
गेल्या 15 वर्षांपासून नवरा-बायकोची ही जोडी आषाढी एकादशीसाठी दरवर्षी सुमारे 250 किमीचा प्रवास करते. पायात चप्पल नाही; पण डोळ्यांत विठ्ठलदर्शनाची आस आहे. चालताना थकवा जाणवत नाही का? असे विचारल्यावर तुकारामबापू फक्त एकच वाक्य म्हणतात, ‘विठोबाच्या नावात इतकी शक्ती असते की शरीर थकलं तरी मन थकत नाही.’
मूळचे मुंढेवाडी, ता. केज, जि. बीडचे हे केंद्रे दाम्पत्य. केंद्रे दाम्पत्याचे आयुष्य साधे आहे. पण, त्यांचा संसार मात्र समृद्ध. चार मुले, नातवंडे, एकत्र कुटुंब आणि प्रेमाने भरलेले घर, हीच त्यांची पुंजी. पैसा नाही; पण समाधान अमाप आहे.
वारकरी दरवर्षी पंढरपूरला पोहचतात आणि त्यात केंद्रेंची जोडीही असते. खांद्याला खांदा लावून चालणारी. ‘श्रद्धा असेल, तर वाट कुठलीही कठीण वाटत नाही,‘ असे ते म्हणतात. पिढ्यान पिढ्या देणे म्हणजे काय, तर केंद्रे कुटुंबाकडून पुढच्या पिढ्यांना मिळणारी ही भक्तीची, निष्ठेची आणि सहजीवनाची शिकवण, हीच खरी संपत्ती असल्याच्या भावना तरुण वारकर्यांकडून व्यक्त होतात.