पुणे : आता राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयावरून वाद

पुणे : आता राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयावरून वाद
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता पुणे शहर पक्ष कार्यालयावरून शरद पवार आणि अजित पवार समर्थक यांच्यात वाद सुरू झाला आहे. अजितदादा गटाचे नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक मानकर यांनी स्वतःहून पक्ष कार्यालय आमच्याकडे द्यावे, अशी मागणी केली आहे. तर, शहराध्यक्ष जगताप यांनी मात्र हे कार्यालय माझ्या नावावर असून, मानकर यांनी नवीन कार्यालय शोधावे, असे उत्तर दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीनगर डेंगळे पूल येथे पक्ष कार्यालय आहे. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या कार्यकाळात हे कार्यालय सुरू झाले आहे.

आता उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून शहराध्यक्षपदी मानकर यांची नियुक्ती झाल्यावर त्यांनी या पक्ष कार्यालयावर दावा केला आहे. याबाबत पत्रकारांशी बोलताना मानकर यांनी जगताप यांनी स्वतःहून पक्ष कार्यालय आमच्याकडे हस्तांतरित करावे. कार्यालय दिले नाही तरी देखील थोड्याच दिवसांत नवीन भव्य कार्यालय उभारू, असे स्पष्ट करीत पक्षाचे कार्यालय स्वतःच्या नावावर करून जगताप यांनी पक्षाची फसवणूक केल्याचा आरोप मानकर यांनी केला. ते पुढे म्हणाले, शरद पवार आमचे दैवत आहेत. त्यांनी कितीही सांगितले तरी आम्ही त्यांचा फोटो वापरणारच; मात्र साहेबांना एक विनंती आहे की, आता त्यांनी अजितदादांना आशीर्वाद द्यावेत.

दादांनी काय 83 व्या वर्षी मुख्यमंत्री व्हावे का? असा खोचक प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, मानकर यांच्या दाव्यावर जगताप म्हणाले की, पक्ष कार्यालय माझ्या नावाने रजिस्टर आहे. त्यांनी नवीन कार्यालय शोधावे. कार्यालयावरून भाऊबंदकीचा वाद करू नये. पक्षात आज आलेल्या लोकांनी हा केविलवाणा प्रयत्न करू नये, असेही त्यांनी सुनावले.

शहर कार्याध्यक्षपदी प्रदीप देशमुख
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने संघटनेच्या विविध पदांवर नियुक्त्या करण्याची प्रक्रिया हाती घेतली असून, पुणे शहराच्या कार्याध्यक्षपदी प्रदीप देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते देशमुख यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. या वेळी राष्ट्रीय कार्याघ्यक्ष प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, विनोद पवार उपस्थित होते. देशमुख हे विद्यार्थिदशेपासूनच काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून राजकारण आणि समाजकारणात कार्यरत आहेत. त्यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यानंतर त्यांनी शहर प्रवक्ता म्हणूनही काम केले आहे.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news