पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहामधील एका विद्यार्थ्याकडे गांजा सापडल्याची घटना नुकतीच समोर आली. याप्रकरणी कारवाईस विलंब झाल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर व शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विद्यापीठाच्या कुलगुरूंची भेट घेऊन मागच्या 14 दिवसांपासून संबंधित प्रकरण का दाबण्यात आले, याबाबत विद्यापीठ प्रशासनाला जाब विचारला. तसेच, सरकार विद्यापीठ हायजॅक करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही धंगेकर यांनी
या वेळी केला.
पुणे विद्यापीठ गेल्या काही दिवसांपासून नवनवीन वादांमुळे चर्चेत आले आहे. त्यात आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील स्किल डेव्हलपमेंट विभागातील एक विद्यार्थी वसतिगृहात गांजा घेऊन आल्याचे निष्पन्न झाले. त्यावर विद्यापीठ प्रशासनाने कारवाई का केली नाही? याचा जाब विविध संघटनांनी विद्यापीठ प्रशासनाला विचारला. विद्यापीठाने याप्रकरणी चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली होती. परंतु, विद्यापीठ प्रशासनाने पोलिसांना या घटनेचा तपशील का दिला नाही? यावर विद्यार्थी संघटनांनी आक्षेप घेतला. रवींद्र धंगेकर यांनी आक्रमक पवित्रा घेत विद्यापीठातील अधिकार्यांना धारेवर धरले. तसेच याप्रकरणी तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली.
सुषमा अंधारे म्हणाल्या, विद्यापीठाचे कुलगुरू, प्र-कुलगुरू व प्रभारी कुलसचिव यांच्याबरोबर आम्ही संवाद साधला. गांजा सापडल्यानंतर 13 दिवस उलटून गेले तरीही कारवाई का केली नाही? कोणत्या प्रकारची प्रक्रिया केली जात होती, याचा खुलासा विद्यापीठाने करावा. विद्यापीठामध्ये नक्षलवादी घुसू नये म्हणून विद्यापीठ प्रशासनाकडून कारवाई केली जाते असे सांगितले जाते. त्यामुळे विद्यापीठाने ते नक्षलवादी कोण आहेत हे स्पष्ट करावे.
त्याचप्रमाणे, विद्यापीठात आमदार रोहित पवार यांनी एनएसयूआय व एसएफआय या संघटनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यातील काही कार्यकर्त्यांवर विद्यापीठ प्रशासनाने विनाकारण गुन्हे दाखल केले, याचे उत्तर विद्यापीठ प्रशासनाने द्यावे अशी मागणीही अंधारे यांनी केली. दरम्यान, विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडे सापडलेला गांजा 50 ग्रॅम होता असे विद्यापीठातील अधिकारी सांगत आहेत. विद्यार्थ्यांकडे सापडलेला गांजा पोलिसांकडे देण्याची प्रक्रिया विद्यापीठाकडून मंगळवारी केली जात होती. संबंधित विद्यार्थ्याला वसतिगृहातून काढून टाकण्यात आले असून त्याचा विद्यापीठातील प्रवेश रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असेही विद्यापीठातील अधिकार्यांनी सांगितले. आमदार रवींद्र धंगेकर, सुषमा अंधारे यांच्यासह विद्यापीठात गजानन थरकुडे, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अक्षय जैन, युवासेना शहरप्रमुख राम थरकुडे, भूषण रानभरे, उमेश वाघ, राहुल शिरसाठ उपस्थित होते.
हेही वाचा