

पुणे; पुढारी वृत्तसेवा : आदेशाचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात साउंड सिस्टिमचा वापर करणार्या हॉटेल तसेच पबचालकांच्या विरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. कोरेगाव पार्क भागातील एका हॉटेलवर कारवाई करून पोलिसांनी पावणेतीन लाख रुपये किमतीची साउंड सिस्टिम जप्त केली. कोरेगाव पार्क, बंडगार्डन परिसरातील पब, हॉटेलांमध्ये मोठ्या आवाजात ध्वनिवर्धकांचा वापर करण्यात येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती.
कोरेगाव पार्क भागातील पब्लिक रेस्टॉरंट अँड बारमध्ये मोठ्या आवाजात साउंड सिस्टिमचा वापर करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली. तेथे दोन लाख 70 हजार रुपये किमतीची यंत्रणा जप्त करण्यात आली. या प्रकरणी पर्यावरण संरक्षण कायद्यातील ध्वनिप्रदूषण नियमावली नुसार कारवाई करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार, सहायक निरीक्षक अश्विनी पाटील, अनिकेत पोटे, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, आण्णा माने, पुष्पेंद्र चव्हाण यांनी ही कारवाई केली.
साडेअकरा लाखांची साउंड सिस्टिम जप्त
रात्री उशिरापर्यंत डीजेच्या तालावर धांगडधिंगा होत असलेल्या हॉटेलांविरुद्ध नागरिकांनीे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर पोलिस आयुक्त, सह पोलिस आयुक्तांनी विशेष मोहीम हाती घेत गेल्या दहा दिवसांत कोंढवा, विमानतळ, कोरेगाव पार्क, बंडगार्डन रस्ता परिसरातील सहा हॉटेलांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. 11 लाख 39 हजार रुपये किमतीची साउंड सिस्टिम यंत्रणा जप्त करण्यात आली.
नियमांचे उल्लंघन करून रात्री उशिरापर्यंत हॉटेलमध्ये साउंड सिस्टिम लावणार्यांच्या विरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत विविध ठिकाणी कारवाई केली जाते आहे. नागरिकांनीदेखील याबाबत तक्रारी केल्या होत्या. आत्तापर्यंत विविध हॉटेलांवर कारवाई करून 11 लाखांची साउंड सिस्टिम जप्त करण्यात आली आहे.
अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त