पुणे: महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना आवश्यक असलेले ना हरकत प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळावे, यासाठी महापालिका स्वतंत्र कक्ष उभारणार आहे. त्यामुळे इच्छुकांना ना हरकत प्रमाणपत्रासाठी हेलपाटे मारावे लागणार नाहीत.
आगामी पालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हरकती-सूचना, राज्य शासन आणि राज्य निवडणूक आयोग यांची मंजुरीची प्रक्रिया होऊन येत्या 16 ऑक्टोबरपर्यंत अंतिम प्रभागरचना जाहीर होणार आहे. त्यानंतर कधीही पालिका निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. (Latest Pune News)
निवडणुकीत उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत पालिकेच्या विविध खात्यांकडून कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र (थकबाकी ना हरकत प्रमाणपत्र) सादर करणे बंधनकारक असते. हे प्रमाणपत्र लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेकडून थकबाकी ना हरकत प्रमाणपत्रांसाठी स्वतंत्र कक्ष उभारला जाणार आहे.
महापलिकेकडून 2017 मध्येच प्रमाणपत्र कक्ष स्थापन केला होता. मात्र, त्या वेळी काही विभागांकडून प्रमाणपत्र वेळेत न मिळाल्याने उमेदवारांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. त्यामुळे यावर्षी प्रशासनाने आधीच तयारी केली आहे.
आयुक्तही घेणार विविध विभागांचा आढावा
निवडणूक कक्षासाठी महापालिका आयुक्तही विविध विभागांचा आढावा घेणार आहेत. त्यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकारी, परिमंडल उपायुक्त तसेच विभागप्रमुखांची बैठक घेतली जाणार आहे. त्यात कोणत्या विभागांकडून थकबाकी प्रमाणपत्र आवश्यक आहे? कोणत्या खात्यांकडे उमेदवारांची थकबाकी असते? एकत्रित प्रमाणपत्र प्रक्रिया सुलभ करण्याचे उपाय तसेच कक्षाच्या कामकाजासाठी वेळमर्यादा आणि जबाबदार्या, याबाबत चर्चा केली जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.