

पुणे : पुढारी वृत्तसेवा : रस्तारुंदीसंदर्भात पीएमआरडीएचा अभिप्राय घेतल्याशिवाय धायरी फाटा येथील नारायणराव नवले शाळेच्या सीमाभिंतीचे बांधकाम सुरू करू नये, अशा सूचना महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाला दिल्या आहेत. धायरी फाट्याजवळील महापालिकेच्या कर संकलन कार्यालयाजवळून (लाडली) नर्हे गावाकडे जाणारा रस्ता अरुंद आहे. हा रस्ता कागदोपत्री 12 मीटर रुंदीचा आहे. मात्र, अतिक्रमणांमुळे जागेवर पाच ते सहा मीटरच आहे. त्यातच या रस्त्यावरून पीएमपी बससह पाण्याचे टँकर व इतर मोठी वाहने ये-जा करतात. त्यामुळे लाडली ते गोकुळनगर यादरम्यान वारंवार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.
याच रस्त्याच्या कडेला महापालिकेची नारायणराव नवले प्राथमिक शाळा आहे. पालक आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी व घेण्यासाठी दुचाकी, रिक्षांमधून येतात. ही वाहने रस्त्याच्या कडेलाच थांबवली जातात. यामुळे आधीच अरुंद असलेल्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होते. दरम्यान, शाळेची जुनी सीमाभिंती पाडून नव्याने बांधली जात आहे. वाहनांची वाढती संख्या, वारंवार होणारी वाहतूक कोंडी याचा विचार करून भविष्यात रस्त्याची रुंदी वाढवावी लागणार आहे.
त्यामुळे दहा ते बारा लाख रुपये खर्चून बांधण्यात येत असलेली भिंत पुन्हा पाडून आतील बाजूस सरकवून नव्याने बांधावी लागणार आहे. या गोष्टीचा विचार करून महापालिकेने आताच शाळेची भिंत आतमध्ये सरकवून बांधावी, अशी मागणी शिवसेना (उबाठा) विभागप्रमुख, खडकवासला विधानसभा महेश पोकळे यांनी सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाकडे केली होती. मात्र, क्षेत्रीय कार्यालयाकडून दाद दिली जात नव्हती. त्यामुळे पोकळे यांनी अतिरिक्त आयुक्त बिनवडे यांच्यासमोर वस्तुस्थिती मांडली. त्यानंतर बिनवडे यांनी रस्त्याच्या रुंदीबाबत पीएमआरडीएचा अभिप्राय घेऊनच भिंतीचे बांधकाम करण्याच्या सूचना क्षेत्रीय अधिकार्यांना केल्या आहेत.
हेही वाचा