महापालिकेत ‘आओ जाओ, घर तुम्हारा’; अधिकारी-कर्मचार्‍यांवर नाही नियंत्रण | पुढारी

महापालिकेत ‘आओ जाओ, घर तुम्हारा’; अधिकारी-कर्मचार्‍यांवर नाही नियंत्रण

हिरा सरवदे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : प्रशासकीय कामांचा पाच दिवसांचा आठवडा केल्यानंतर कामाचे तास वाढविले असतानाही पालिकेमध्ये मात्र कामावर येण्याचा व जाण्याचा वेळ फार कोणी पाळत नाही. अधिकार्‍यांसह कर्मचारीही केव्हाही येतात आणि जातात. त्यामुळे पालिकेतील चित्र ‘आओ जाओ, घर तुम्हारा’सारखे दिसते. त्यामुळे महापालिका भवनातील वेगवेगळी कार्यालये ओस पडलेली असतात, त्यामुळे कामानिमित्त आलेल्या नागरिकांना ताटकळत थांबावे लागते. राज्य शासनाने शासकीय कार्यालयांच्या कामकाजासाठी राज्य सरकारने पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला आहे.

त्याचसोबत कार्यालयीन कामकाजाचे तास वाढवून कार्यालयात येण्याची वेळ सकाळी 9.45 आणि घरी जाण्याचा वेळ संध्याकाळी 6.15 केला आहे. शिपाई सेवकांनी पंधरा मिनिटे अगोदर येणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक अधिकारी व कर्मचारी सकाळी उशिरा कार्यालयात येतात, तर सायंकाळी पाच वाजल्यापासूनच घरी जाण्यास सुरुवात करतात, वरिष्ठांना कल्पना न देता कार्यालयातून गायब होतात, असे दिसून येत आहे.

दैनंदिन कामकाजासाठी महापालिकेत येणार्‍या पुणेकरांना अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या मनमानी कारभाराचा फटका सहन करावा लागत आहे. अनेक कार्यालयांमध्ये उपस्थित कर्मचारी घोळका करून तासन् तास गप्पा मारत बसतात. याशिवाय अनेक महिला कर्मचारी नवीन इमारतीमध्ये येऊन टाइमपास करतात, तासन् तास वॉकिंग करीत असतात. त्यामुळे कामे घेऊन येणार्‍यांना ताटकळत थांबून अनेकवेळा रिकाम्या हाती जावे लागत आहे.

दिवसभरात केवळ तीन ते साडेतीन तास काम

महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त कार्यलय वगळता अनेक विभागांचे प्रमुख सकाळी अकरानंतरच महापालिकेत येतात. काही कर्मचारी सव्वाअकरा वाजता येतात. सकाळच्या सत्रात अवघा दीड तास काम होते. पुन्हा कर्मचारी एकत्र चहासाठी जातात. साडेपाच वाजेपासूनच कामकाज बंद करतात. म्हणजे दुपारच्या सत्रातही दीड ते दोन तासांपेक्षा अधिक काम केले जात नाही. त्यामुळे दिवसभरात केवळ तीन ते साडेतीन तास काम केले जात आहे.

हेही वाचा

Back to top button