पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महिलांना कोणत्याही क्षेत्रात रेड कार्पेट नाही. त्यांना टिकून राहण्यासाठी संघर्ष करावाच लागतो. अशा परिस्थितीत महिलांनी रडणारे नव्हे, तर लढणारे व्हायला हवे, असे प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले.
पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात महिला मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. माजी महापौर उषा ढोरे, माजी स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा उज्ज्वला गावडे, माजी नगरसेविका आशा शेंडगे-धायगुडे, सुजाता पालांडे, शारदा सोनवणे तसेच, अश्विनी जगताप, वैशाली खाड्ये, कुंदा भिसे आदी उपस्थित होते.
वाघ म्हणाल्या की, 'अत्याचार पीडित महिलांना मदत करण्यासाठी आपण पुढे यायला हवे. मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून या महिलांचे सक्षमीकरण शक्य आहे. महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फेसबुक, टि्वटर आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले काम जगासमोर आणायला हवे. पक्षाच्या विचारधारेनुसार आपण काम करायला हवे.'
देशात आणि राज्यात विरोधकांकडून भाजपविरोधी वातावरण निर्माण केले जात आहे, असे वाघ यांनी नमूद केले. त्या म्हणाल्या, कोणालाही मतदान करा, मात्र भाजपला मतदान करू नका, असा सूर विरोधकांकडून आळविला जात आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची भूमिका घेण्याबाबत आग्रह धरला जात आहे. त्यांना आपण चोख उत्तर द्यायला हवे, असे वाघ यांनी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मतदानाच्या अधिकारामुळे 50 टक्के मातृशक्तीला उच्च प्रवाहात आणले आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून घरोघरी स्वच्छतागृह आले आहेत. उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून घरोघरी गॅस आला आहे. कोरोना महामारीच्या काळात मोफत लस, गोरगरिबांना धान्य देण्याचे काम झाले आहे. तिहेरी तलाकविरोधी कायदा करण्यात आला आहे.