पुणे : पाच वर्षांनंतरही पीएमपीच्या प्रवासी संख्येत वाढ नाही; मार्गावरील गाड्याही तेवढ्याच

पुणे : पाच वर्षांनंतरही पीएमपीच्या प्रवासी संख्येत वाढ नाही; मार्गावरील गाड्याही तेवढ्याच
Published on
Updated on

प्रसाद जगताप

पुणे : पीएमपीची प्रवासी संख्या 2016 मध्ये होती 11 लाख. त्यानंतर साडेपाच वर्षांनी म्हणजे 2022 मध्ये ती झाली 13 लाख. याच काळात मार्गावरील रोजच्या गाड्या 1 हजार 670 वरून 1 हजार 650 एवढ्या झाल्या. म्हणजेच गाड्या वीसने घटल्या. वाढत्या लोकसंख्येला पुरी पडेल, अशी यंत्रणा उभी करण्यात पीएमपीला अपयश आल्याचे आणि त्यातूनच वाहतुकीची भीषण समस्या उभी राहिल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे.

पीएमपीच्या मार्गावरील गाड्यांच्या संख्येत वाढ होऊन पीएमपीचे उत्पन्न वाढावे, प्रवाशांची संख्या वाढावी, याकरिता 'आयटीडीपी' या वाहतूक अभ्यासक संस्थेच्या वतीने मार्ग सुसूत्रीकरणाचा एक अहवाल तयार करण्यात आला होता. या अहवालाला पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यताही देण्यात आली होती.

त्यानुसार पीएमपीच्या मार्गांमध्ये शास्त्रशुद्ध बदल झाले असते, तर पीएमपी प्रवाशांच्या संख्येत भरीव वाढ झाली असती अन् पुणे शहरातील खासगी वाहनसंख्या कमी होण्यास मोठा हातभार लागला असता. परंतु, या अहवालानुसार काहीही काम सुरू नसल्याचे दिसून येत असून, या अहवालातील मार्ग सुसूत्रीकरणाच्या तत्त्वांचाच पीएमपीला विसर पडला आहे. या तत्त्वांचे पालन व्यवस्थितरीत्या होत नसल्यामुळे पाच वर्षांनंतरही पीएमपीच्या प्रवासी संख्येत म्हणावी तशी वाढ झालेली नाही, असा आरोप वाहतूक तज्ज्ञांकडून करण्यात आला आहे.

मार्ग सुसूत्रीकरण प्रक्रियेचा प्रवास
काही मार्गांवर बसची प्रचंड मागणी आहे, मात्र त्याठिकाणी बस उशिरा जातात. तर, ज्याठिकाणी प्रवासी नाहीत, अशा ठिकाणी एकापेक्षा अधिक मार्गांवरील बस धावतात. त्यामुळे काही बस रिकाम्या धावतात, अशी स्थिती होत होती. त्यामुळे मार्ग सुसूत्रीकरणाची गरज पडली. त्यानुसार 'आयटीडीपी' या संस्थेने मार्गांच्या सुसूत्रीकरणाचा अहवाल 2016 साली तयार केला अन् पीएमपीला सादर केला. याला संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार पीएमपी व्यवस्थापनाने त्यातील 80 टक्के शिफारशी स्वीकारल्या, अन् 20 टक्के बदल सुचवून अहवाल मान्य केला. सुरूवातीला या अहवालानुसार कार्यवाही झाली. मात्र, कालांतराने याकडे दुर्लक्षच होत गेले.

बसमार्ग सुसूत्रीकरण करताना मुख्य उद्देश शहरांतर्गत बस बदली करण्याचे प्रमाण कमी करणे आणि शहराच्या सीमेवर बदलीची व्यवस्था, फीडर देणे हे आहे. एक बस चारचाकीपेक्षा 40 पट अधिक प्रवासी वाहून नेत असल्याने शहरातील वाहतूक कोंडीच्या रस्त्यावर मोठ्या बस असणे अपेक्षित आहे. बाहेरील गावांत कमी प्रवासी असल्याने छोट्या बस फीडरसारख्या असाव्यात. परंतु, पीएमपीएमएलने हेच समीकरण उलटे केले आहे. बस ही वाहतूक कोंडी करत नाही, तर त्यावर पर्याय देते. हे तत्त्व प्रशासन जोपर्यंत लक्षात घेत नाही, तोपर्यंत पुण्याची वाहतूक कोंडी सुटणार नाही. तसेच, शहराबाहेर गाड्या सुरू करण्याचा सपाटा थांबविला पाहिजे. यासोबतच मार्गांच्या सुसूत्रीकरणाच्या धोरणानुसार कामकाज चालायला हवे. तरच, प्रवासी संख्या वाढणार आहे.

                                                     – प्रांजली देशपांडे, वाहतूक अभ्यासक

पीएमपीच्या ताफ्यात सध्या नव्या गाड्यांची संख्या वाढत आहे. मात्र, कर्मचार्‍यांची संख्या कमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भरती प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे गाड्या जास्तीत जास्त जरी रस्त्यावर उतरवल्या, तरी त्यांना पुरेसे असे मनुष्यबळ नाही. 2 हजार वाहकांची आत्ताच पीएमपीला आवश्यकता आहे. याकरिता टेंडर प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासोबतच अनेक ठिकाणी मार्गांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना वेळेत सेवा पुरविता येत आहे.

                                   – दत्तात्रय झेंडे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल

…असे झाले आहेत बदल
पीएमपीबाबत तपशील – 2016 – 2022
रोजची प्रवासी संख्या – 11 लाख प्रवासी – 13 लाख प्रवासी
एकूण मार्ग – 350 मार्ग – 369 मार्ग
एकूण बससंख्या – 2 हजार 55 बस – 2 हजार 142
रस्त्यावरील एकूण बससंख्या – 1670 गाड्या – 1650/1700 गाड्या
बसगाड्यांची एकूण रोजची धाव – 3 लाख 13 हजार किमी – 3 लाख 60 हजार किमी
एका बसची प्रवासी क्षमता – 32 प्रवासी – 33 प्रवासी
एका बसची रोजची धाव – 192 कि.मी – 230 किमी
एका बसची प्रवासी वाहण्याची क्षमता – 660 प्रवासी – 800 प्रवासी

मार्ग सुसूत्रीकरणाची तत्त्वे …
महापालिकेच्या हद्दीतच बससेवा पुरविणे
प्रवाशांना कमी वेळेत बस उपलब्ध करून देणे
पीएमपीच्या ताफ्यातील गाड्या शहराच्या लोकसंख्येनुसार वाढविणे
प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची असलेल्या टर्मिनल स्थानकांसाठी जागा शोधणे
आवश्यक तेथे 'बीआरटी'त वाढ करणे

पीएमपीच्या ताफ्यातील आताची बससंख्या
स्वमालकीच्या – 1012
भाडे तत्त्वावरील – 1130
एकूण – 2 हजार 142
सीएनजी – 1594
डिझेल – 150
इलेक्ट्रिक – 398

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news