वर्षा कांबळे
पिंपरी (पुणे): पिंपरी चिंचवड महापालिकेच्या खराळवाडी बालभवन शाळेची नुकतीच डागडुजी करण्यात आली आहे. मात्र, दुरुस्तीनंतरही शाळेमध्ये समस्या आहेत. अपुर्या सुविधेमुळे शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. खराळवाडी शाळेच्या इमारतीची यापूर्वी दुर्दशा झाली होती. रंगरंगोटी नाही, गळणारे छत यामुळे याठिकाणी शिकणे देखील मुश्किल झाले होते. सध्या शाळेची दुरुस्ती करण्यात आली आहे. रंगकाम, छत दुरुस्ती, स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्यात आली आहे. मात्र, स्वच्छतेचा आभाव असल्यामुळे शाळेत दुर्गंधीचे साम्राज्य आहे.
शाळेतील स्वच्छतागृह नव्याने तयार करण्यात आली आहेत. मात्र, याठिकाणी स्वच्छतेचा आभाव असल्याने शौचालयाची दुर्गंधी सर्व शाळेमध्ये पसरत आहे. तसेच शौचालय अंधार्या ठिकाणी असून याठिकाणी पुरेशी लाईटची व्यवस्था केलेली नाही.
शाळेचे मुख्य प्रवेशदद्वार चांगल्या स्थितीमध्ये आहे. मात्र, शाळेच्या मागच्या बाजूस असणारे गेट काढण्यात आले आहे. याठिकाणी नवीन गेट अद्याप बसविले नाही. त्यामुळे शाळेत कोणीही प्रवेश करू शकतो. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच रात्रीच्या वेळी देखील शाळेतील सामान चोरीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शाळेची रंगरंगोटी केली बाहेरुन शाळा अगदी नवीन कोरी दिसत आहे. पण शाळेची ओळख हे तिचे नाव असते. शाळेच्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर अद्याप शाळेचे नाव टाकलेले नाही.
पिण्याच्या पाण्याची गैरसोय
पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव आहे.
मनपाच्या बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांना फिल्टरच्या पाण्याची सुविधा आहे. याठिकाणी फिल्टरची सुविधा नाही. पिण्याच्या पाण्याचे नळ खराब झालेे आहेत.
जेवणासाठी तयार केलेल्या शेडवर पत्रे नाहीत
मुलांना मधल्या सुटीत जेवायला सावलीत बसण्यासाठी याठिकाणी पत्राशेड तयार करण्यात आले आहेत. पण याठिकाणी दुरुस्ती केल्यापासून शेडवर पत्रे टाकण्यात आलेले नाही. त्यामुळे मुलांना झाडाखाली किंवा इतर ठिकाणी सावली शोधून जेवण करावे लागत आहे.