

पुणे: पुण्यातील एनआयव्ही म्हणजेच राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने ‘नक्षत्र’ हा अत्याधुनिक हाय परफॉर्मन्स महासंगणक कार्यान्वित केला. त्यामुळे भविष्यात संभाव्य साथीच्या आजारांचा सामना करण्यासह देशाची जिनोमिक संशोधन क्षमता वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून एनआयव्हीच्या संशोधन मोहिमेला गती मिळाली आहे.
‘नक्षत्र’ महासंगणकीय प्रणालीत १२ कम्प्युट नोडस् ७०० कोअर्स आणि १ पेटॅबाईट डेटा साठवणूक क्षमता आहे. या प्रचंड तांत्रिक क्षमतेमुळे ‘एनआयव्ही’मधील बायोइन्फॉर्मेटिक्स आणि विषाणूंच्या जनुकीय संरचनेचा अभ्यास करण्याची व्याप्ती कमालीची वाढली आहे. या माध्यमातून नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग, ट्रान्सक्रिप्टॉमिक्स, फायलोजेनेटिक्स, मेटाजिनोमिक्स आणि स्ट्रक्चरल बायोइन्फॉर्मेटिक्स यांसारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या वैज्ञानिक प्रक्रिया आता सहज आणि अचूकपणे पार पाडता येत आहेत.
एनआयव्हीमध्ये नवे काय?
संसर्गजन्य आजारांसह भविष्यातील साथीच्या रोगांना रोखण्यावर भर आहे.
जलद निदान, स्वदेशी लसी आणि पॅन-इंडिया देखरेख यांवर केंद्रित केले आहे.
‘एनआयव्ही’ने निपाह विषाणूचा शोध घेण्यासाठी एक पोर्टेबल स्वदेशी ‘रॅपिड टेस्ट किट’ विकसित केले आहे.
यासाठी मोठ्या किंवा महागड्या मशिनची गरज नसून केवळ १ ते २ तासांत याचे अचूक निकाल मिळतात. या चाचणीची किंमत अवघी २५० रुपये असून ती दुर्गम भागातही वापरली जाऊ शकते.
‘एनआयव्ही’ देशात पसरणाऱ्या डेंग्यूच्या विविध प्रकारांचा सखोल अभ्यास करीत आहे.
डेंग्यूच्या विषाणूमध्ये नेमके कोणते जनुकीय बदल होत आहेत, त्यामुळे भविष्यात मोठी महामारी येऊ शकते का याची पूर्वसूचना प्रणाली विकसित करण्याचे काम सुरू आहे.
‘एनआयव्ही’च्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशातील श्वसनसंस्थेशी संबंधित विषाणूंचे (उदा. इन्फ्लूएंझा, आरएसव्ही आणि विविध नवीन कोरोना स्ट्रेन्स) ट्रॅकिंग केले जात आहे.
या संशोधनांतर्गत विशेषतः केरळ आणि पश्चिम बंगालमधील प्रयोगशाळा अधिक बळकट केल्या जात असून संपूर्ण भारतातून येणाऱ्या नमुन्यांचे विश्लेषण पुण्यात केले जात आहे.
‘एनआयव्ही’ने मंकीपॉक्सच्या निदानासाठी व लस विकासासाठी विशेष संशोधक पथक तयार केले आहे.
प्राण्यांकडून मानवात येणारे विषाणू व मानवी आरोग्यासोबतच प्राण्यांमधील विषाणूंचा अभ्यास करण्यासाठी अपेक्स सेंटर फॉर बीएसएल-3 लॅब नेटवर्क स्थापन केले आहे.
महासंगणकाचे थेट फायदे
ज्या जटिल जनुकीय विश्लेषणासाठी पूर्वी संशोधकांना अनेक महिने वाट पाहावी लागायची, ते काम आता अवघ्या २४ ते ४८ तासांत पूर्ण करणे शक्य झाले आहे. या संगणकाच्या वेगवान प्रक्रियेमुळे नवीन विषाणूंचे निदान करणे आणि त्यांच्याविरोधात एआय आधारित औषधे, प्रभावी लस विकसित करण्याच्या संशोधनाला वेग आला आहे. हा महासंगणक सुरुवातीला देशातील ५ प्रमुख ‘आयसीएमआर’ संस्थांना सेवा देणार असून आगामी काळात तो देशभरातील ‘व्हायरल रिसर्च अँड डायग्नोस्टिक लॅबोरेटरीज’साठी डेटा सुरक्षित ठेवणारे मुख्य केंद्र म्हणून काम करेल. ‘नक्षत्र’मुळे नवीन रोगांच्या धोक्यांचा वेळीच शोध घेऊन आरोग्य आणीबाणीला वेगाने प्रतिसाद देणे भारताला आता शक्य होणार आहे