इंदापूर: जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या नीरा स्नानापूर्वी मंगळवारी (दि. 1) निरा नदीकाठी सराटी (ता. इंदापूर) आणि अकलूजला जोडणार्या नीरा नदीवरील बंधार्यातून सकाळी सव्वा सहाच्या सुमारास वारीत सहभागी असलेला गोविंद फोके (वय 15, रा. झिरपी, ता. अंबड, जि. जालना) हा मुलगा अंघोळीला गेल्यानंतर पाण्यात वाहून गेला होता. तब्बल 35 तासांनंतर बुधवारी (दि. 2) सायंकाळी पाच वाजता त्याचा मृतदेह सापडला.
गोविंद आपल्या आजी परेगा प्रभाकर खराबे यांच्यासोबत संत तुकोबांच्या वारीत चालत होता. तो पाण्यात वाहून जात असताना आरडाओरडा केल्यानंतर त्याला वाचवण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला; मात्र पाण्याचा अति वेग असल्यामुळे तो प्रयत्न निष्फळ ठरला होता. त्याला शोधण्यासाठी स्थानिक व एनडीआरएफचे जवान, पोलिस शोध कार्य करीत होते.
तब्बल 35 तास त्याचा शोध सुरू होता. इंदापूर तालुक्यातील सराटी तसेच माळशिरस तालुक्यातील अकलूजच्या बाजूला नीरा नदीमध्ये बंधार्यापासून दोन किलोमीटर अंतरावर त्याचा मृतदेह सापडल्याची माहिती अकलूज (ता. माळशिरस) येथील सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे यांनी दिली.
घटना घडल्यानंतर मंगळवारी एनडीआरएफच्या जवानांनी शोध घेतला; मात्र यश आले नाही. बुधवारी सकाळी कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी प्रसाद संकपाल यांनी पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीकाठी कार्यरत असलेले आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सत्यसागर ढोले यांना कळविल्यानंतर कोल्हापूरची 20 जणांची वजीर रेस्क्यू टीम सराटी येथे आली.
त्यांनी मृतदेह पाण्याबाहेर शोधून काढला. नदीत पाण्याचा वेग जास्त असल्याने गोताखोर यालाही शोध कार्याला अडथळा येत होता; मात्र दोन किलोमीटर नदीपात्रातून पुढे शोधत गेल्यानंतर त्याचा मृतदेह सापडल्याचे रेस्क्यू टीमचे अब्दुलरौफ पटेल यांनी सांगितले.