निरा: निरा खोर्यातील भाटघर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने रविवारी (दि. 17) धरण पूर्णक्षमतेने भरले. रविवारी दिवसभरात निरा देवघर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात जोरदार पाऊस पडल्याने धरण 98.28 टक्के भरले असून, ते ‘ओव्हरफ्लो’ होण्याच्या मार्गावर आहे.
दुसरीकडे भाटघर धरणातून सोमवारी (दि. 18) दुपारी 4 वाजता 10 हजार 14 क्युसेक, निरा देवघर धरणातून रात्री 8 वाजता 24 हजार 435 क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला. यामुळे निरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Latest Pune News)
येसाजी कंक जलाशयाचे पूजन
भाटघर धरण पूर्णक्षमतेने भरल्यानंतर सोमवारी भाटघर धरणाच्या येसाजी कंक जलाशयाचे पूजन जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉ. हेमंत धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर दुबल व निरा पाटबंधारे उपविभागाचे सहाय्यक अभियंता योगेश भंडलकर तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
निरा नदीत विसर्ग सोडण्यात आल्याने नागरिकांनी निरा नदीपात्रात उतरू नये, नदीपात्रात कुठल्याही विभागाचे काम सुरू असेल, तर त्या विभागाने बांधकाम नदीकाठावरील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. नदीपात्रात पिण्यासाठी व शेतीसाठी असलेले पंप सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावेत. सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात येत आहेत. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी.
- दिगंबर दुबल आणि योगेश भंडलकर, कार्यकारी अभियंता, पुणे पाटबंधारे विभाग आणि सहाय्यक अभियंता, निरा पाटबंधारे उपविभाग