

नसरापूर: पुणे जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समितीच्या गणांच्या प्रारूप रचनेवरील हरकतींवरील सुनावणी पूर्ण झाली असून, भोर तालुक्यातील गट-गणरचनेत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे इच्छुकांची राजकीय गणिते बदलली आहेत. बदलांमुळे राजकीय गणिते कोलमडली असून, आगामी निवडणुकीत बराचसा फरक पडणार असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
तेलवडी (ता. भोर) येथील चेतन पोपट धावले यांनी भोंगवली गटातील रचनेबाबत हरकत दाखल केली होती. त्यामध्ये त्यांनी नमूद केले होते की, भोंगवली गटामध्ये वर्तुळाकार पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. (Latest Pune News)
यामुळे संगमनेर गण आणि भोंगवली गण या दोन्हीमध्ये तांबाड, हातवे खुर्द आणि हातवे बुद्रुक या गावांचा एकत्रित समावेश होऊ शकत नाही. धावले यांनी या गावांना भोंगवली गटातून व संगमनेर गणातून वगळून वेळू गटात समाविष्ट करण्याची मागणी केली. त्यांचे म्हणणे आहे की, भौगोलिकदृष्ट्या ही गावे नसरापूर गणाला लागून आहेत.
सदर वेळू विभाग हा वेळू गण आणि नसरापूर गण अशा दोन भागांत विभागलेला आहे. वेळू गणात महामार्गावरील गावांचा समावेश आहे, तर नसरापूर गणात गुंजवणी नदीलगतची गावे आहेत. तांबाड, हातवे खुर्द आणि हातवे बुद्रुक ही तिन्ही गावे गुंजवणी नदीलगत असल्याने वर्तुळाकार पद्धत व भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांचा समावेश नसरापूर गणात (पर्यायाने वेळू गटात) करावा. तसेच लोकसंख्येचा समतोल राखण्यासाठी उंबरे, कामथडी आणि करंदी ही गावे संगमनेर गणात समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली होती.
तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी यांनी याबाबत आपापले अभिप्राय मांडल्यानंतर यावर विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सुनावणी करीत निर्णय दिला. त्यामध्ये अर्जदार यांनी केलेली मागणी ही भौगोलिक संलग्नता व लोकसंख्येच्या निकषात बसत आहे.
त्यामुळे अर्जदार यांची सदरची हरकत मान्य करण्यात आली असून, संगमनेर गणातील हातवे खुर्द, हातवे बुद्रुक व तांभाड ही गावे वगळता नसरापूर गणात घेण्यात आली आहेत, तर नसरापूर गणातील उंबरे, कामथडी व करंदी ही गावे संगमनेर गणात समाविष्ट करण्यातआली आहेत. संगमनेर या ग्रामपंचायतीची लोकसंख्या ही 1959 अशी आहे. तसेच कामथडी या ग्रामपंचायतीची तोकसंख्या ही 2452 आहे. त्यामुळे या गणाचे नाव संगमनेर गणाऐवजी कामथडी गण असे करण्यात आले आहे.