

बारामती : निरा खोर्यातील प्रमुख चार धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत आजअखेर सुमारे 47 टक्के अधिकचा पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे कालव्यावर अवलंबून असणार्या शेतकर्यांची चिंता मिटली आहे. निरा खोर्यात भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी ही प्रमुख धरणे आहेत. या धरणातील पाण्यावर बारामती, पुरंदर, इंदापूर तालुक्यांतील शेती क्षेत्र अवलंबून आहे. याशिवाय सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण, माळशिरस या तालुक्यांसाठी ही धरणे वरदान ठरली आहेत.
निरा खोर्यातील भाटघर धरणात सध्या 17.389 टीएमसी पाणीसाठी उपलब्ध आहे.
हे धरण 73.99 टक्क्यांवर पोहचले आहे. निरा देवघर धरणात 6.530 टीएमसी पाणीसाठा असून, ते 55.67 टक्क्यांवर गेले आहे. वीर धरणात 7.795 टीएमसी पाणीसाठा असून, हे धरण सध्या 82.86 टक्क्यांवर जाऊन पोहचले आहे. वीर धरणातून निरा डावा कालव्यात 600 क्युसेकने पाणी सोडले जात आहे, तर निरा उजवा कालव्यात 1 हजार 204 क्युसेकने पाणी सोडले जात आहे. गुंजवणी धरणात सध्या 2.567 टीएमसी पाणीसाठा असून, 69.56 टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. या चारही धरणांतून 1.432 टीएमसी पाणी सोडले जात आहे. चारही धरणांत मिळून 34.282 टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला असून, एकूण पाणीसाठा 70.93 टक्क्यांवर जाऊन पोहचला आहे. गतवर्षी याच तारखेला या चारही धरणांत मिळून 11.549 टीएमसी पाणीसाठी होता. त्याची टक्केवारी 23.90 इतकी होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 47 टक्के अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे.
निरा खोर्यातील धरणांचा पाणीसाठा सध्या समाधानकारक आहे. परंतु, धरणातील पाण्यावर अवलंबून असणार्या भागात पावसाने दडी मारली आहे. राज्याच्या अन्य भागांत धो-धो कोसळणारा पाऊस बारामती, पुरंदर, इंदापूरला हुलकावणी देत आहे. धरणातील पाणी कालव्याद्वारे मिळत असले तरी त्याला मर्यादा आहेत. पावसाने साथ दिली तर विहिरी, कूपनलिका यांची पाणीपातळी वाढत असते. त्यामुळे या भागात पावसाची अत्यंत गरज निर्माण झाली आहे.