

ओतूर; पुढारी वृत्तसेवा: ओतूर-ओझर रस्त्यावर भरधाव धावणार्या इर्टिगा कारने सायकल खेळणार्या 9 वर्षांच्या मुलास मागच्या बाजूने धडक दिली. यामध्ये हा मुलगा गंभीर जखमी होऊन रस्त्यावर उडून पडला. त्यास स्थानिकांनी लागलीच ओझर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, त्याचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. या मुलाचे नाव आवेज इरफान शेख (वय 9, रा. येधे हिवरे, ता. जुन्नर) असे आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले, की आवेज ओझर मार्गावर शनिवारी (दि. 1) सायकल खेळत होता. या वेळी दुपारी सव्वा चार वाजेच्या दरम्यान हिवरे (वडमळा) येथे भरधाव आलेल्या इर्टिगा कारने आवेज याला धडक दिली. यामध्ये आवेज याचा मृत्यू झाला. याबाबत मुलाचे वडील इरफान दगडू शेख यांनी ओतूर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली असून, ओतूर पोलिसांनी इर्टिगा (एमएच 14 केएफ 7109) चा चालक प्रतीक भरत नलावडे याचे विरुद्ध अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. याबाबत ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे.