

Pune 2022 Bogus Kidney Transplant Racket
पुणे : रुबी हॉल रुग्णालयातील किडनी प्रत्यारोपण रॅकेटमध्ये सहआरोपी असलेला ससून सर्वोपचार रुग्णालयाचा तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरेच्या अध्यक्षतेखाली ससूनच्या ‘विभागीय मानवी अवयव प्राधिकार समितीने’ एकूण नऊ किडनी प्रत्यारोपणांना परवानगी दिली आहे. त्याने आपल्या पदाचा दुरुपयोग करून बनावट व्यक्तीला बनावट कागदपत्रांच्या आधारे किडनी प्रत्यारोपण करण्यास परवानगी दिली. त्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याने त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील दिगंबर खोपडे यांनी न्यायालयाला केली. न्यायालयाने त्याला 2 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
कल्याणीनगर पोर्श अपघात प्रकरणात अल्पवयीन कारचालकाच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी तावरे मागील वर्षभरापासून येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. किडनी प्रत्यारोपण रॅकेट प्रकरणात त्याचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर गुन्हे शाखेने प्रॉडक्शन वॉरंटद्वारे तावरेला येरवडा कारागृहातून ताब्यात घेतले. त्याला गुरुवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. या गुन्ह्यात त्याच्या आणखी कोणत्या सहकार्याचा सहभाग आहे का, याबाबत तपास करायचा आहे.
ससूनच्या विभागीय मानवी अवयव प्राधिकार समितीच्या मुलाखतीसाठी रुग्ण अमित साळुंखेची पत्नी सुजाताऐवजी हजर राहिलेल्या सारिका सुतारच्या वयात तफावत होती. आरोपी शंकर पाटील, सारिका सुतार यांच्या हालचाली संशयास्पद होत्या. समितीच्या प्रश्नांना त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यांच्या उत्तरात विसंगती आढळून आल्या. तरीही तावरेच्या अध्यक्षतेखाली या समितीने किडनी प्रत्यारोपणाला मंजुरी दिली. त्यामुळे या समितीने आणखी काही अवयव दान प्रकरणांमध्ये गैरप्रकार केले आहेत का, याबाबत तपास करायचा आहे. त्यासाठी आरोपी अजय तावरेला पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी तपास अधिकारी सहायक आयुक्त गणेश इंगळे व सरकारी वकील दिगंबर खोपडे यांनी केली.
या प्रकरणी गुन्हे शाखेच्या तपासात रुबी हॉल क्लिनिकचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेझ ग्रँट, उपसंचालक रेबेका जॉन, कायदेशीर सल्लागार मंजुषा कुलकर्णी, रुग्णालयातील मूत्रपिंड विकार तज्ज्ञ डॉ. अभय सद्रे, मूत्रविकारतज्ज्ञ डॉ. भूपत भाटी, डॉ. हिमेश गांधी, प्रत्यारोपण समन्वयक सुरेखा जोशी यांच्याकडून आर्थिक देवाण घेवाण झाल्याचे दिसून आले नाही. डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया कायदेशीर मार्गाने केली असून, आरोपींनी बैठकीच्या वेळी खोटे बोलून डॉक्टर व त्यांच्या कर्मचार्यांची दिशाभूल केल्याचे तपासात निदर्शनास आले. त्यामुळे या सर्वांविरोधात सबळ पुरावे नसल्याने आरोपपत्र दाखल केले नाही.
या प्रकरणात आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉ. संजोग सीताराम कदम यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार, अजय तावरेसह एकूण सतरा आरोपींविरोधात कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये रुग्ण अमित अण्णासाहेब साळुंखे, त्याची पत्नी सुजाता अमित साळुंखे, त्याचे वडील अण्णासाहेब साळुंखे, रुग्णाला किडनी देणारी सारिका सुतार, किडनी दात्याची बनावट कागदपत्रे तयार करणारे अभिजित शशिकांत गटणे, रवींद्र महादेव रोडगे, डॉक्टरांची दिशाभूल करणारे शंकर हरिभाऊ पाटील, सुनंदा शंकर पाटील, आरोपींना किडनी प्रत्यारोपणास मदत करणारा भाऊ सावंत आदींचा समावेश आहे.
या प्रकरणी आरोग्य विभागाने केलेल्या चौकशीत अवयव दाता आणि प्रत्यारोपित रुग्णाची ओळख पडताळून कागदपत्रे तपासण्याची जबाबदारी विभागीय मानवी अवयव प्राधिकार समितीची असल्याचे निष्पन्न झाले. या समितीनेच बनावट अवयव दात्यांना खोट्या कागदपत्रांच्या आधारे अवयव प्रत्यारोपणास परवानगी देऊन एजंट, अवयव दाता व अवयव घेणारा रुग्ण या आरोपींना गुन्हा करण्यासाठी मदत केली. बनावट अवयव दात्याची ओळख पडताळण्यासाठी कोणतीही कागदपत्रे तपासली नाहीत; तसेच आर्थिक देवाणघेवाणीची खातरजमा केली नाही. डॉ. अजय तावरे हा समितीचा अध्यक्ष होता. त्याने या प्रकरणातील किडनी दाता व प्रत्यारोपित रुग्ण व साक्षीदार नातेवाईकांची मुलाखत घेतली होती. त्यामुळे या प्रकरणात त्याची मुख्य जबाबदारी होती, असे आरोग्य विभागाच्या चौकशी अहवालात नमूद आहे.