यंदा कर्तव्यासाठी नऊ मुहूर्त; लग्नाळूंसह नातेवाईकांची धावाधाव

यंदा कर्तव्यासाठी नऊ मुहूर्त; लग्नाळूंसह नातेवाईकांची धावाधाव
Published on
Updated on

पुणे : मे आणि जून महिना म्हणजे लग्नसराईचा… पण, यंदा या महिन्यांमध्ये लग्नाचे अवघे नऊच मुहूर्त असल्यामुळे या क्षेत्राशीसंबधी व्यवसायांवर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. फारसे बुकिंग नसल्याने त्यांना मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागत आहे. केटरिंगवाल्यांपासून ते मंडप व्यावसायिकांपर्यंत, मंगल कार्यालयचालक ते छायाचित्रकारांपर्यंत, लग्नकार्यावर आधारित या 70 ते 80 व्यवसायांना आर्थिक झळ बसली आहे. एप्रिलमध्ये मुहूर्त असले, तरी त्यानंतर मे आणि जून महिन्यात फारसे काम नसल्याने ऐन सीझनमध्ये आम्ही काय करावे? असा प्रश्न व्यावसायिकांना पडला आहे.

नोव्हेंबर ते जून असा लग्नकार्याचा सीझन असतो. या वर्षी गुरू आणि शुक्र यांचा एकत्रित अस्तकाल असताना म्हणजेच 3 मे ते 11 जूनपर्यंत फारसे लग्नाचे मुहूर्त नाहीत. 12 जूननंतर लग्नाचे मुहूर्त असले, तरी त्याची संख्या फक्त सातच आहे. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या पुणे जिल्ह्यातील अनेक व्यावसायिकांना याचा फटका बसला आहे. दोन्ही महिन्यांचे फारसे बुकिंग नसल्यामुळे मंगलकार्यालय, बँक्वेट, लॉनमालकांसह पुरोहित, छायाचित्रकार, व्हिडीओग्राफर, फुलांचे विक्रेते, सजावटकार, इव्हेंट कंपन्या, डीजे, साउंड अँड लाइट व्यावसायिक, केटरिंग, मंडपवाले, मेकअप आर्टिस्ट, ब्राॅस बँड पथक… अशा विविध व्यवसायांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. याचा शहरातीलच नव्हे, तर ग्रामीण भागातील व्यावसायिकांनाही आर्थिक फटका बसला आहे.

महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनचे किशोर सरपोतदार म्हणाले, नोव्हेंबर ते जून हा लग्नकार्याचा सीझन असतो. पण, एप्रिल महिना सोडला तर मे आणि जूनमध्ये फारसे लग्नाचे मुहूर्तच नाहीत. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या 70 ते 80 व्यवसायांना फटका बसला आहे. काही दिवस व्यावसायिकांना व्यवसाय बंद ठेवावा लागणार असल्याची परिस्थिती आहे. मंगलकार्यालयाचे मालक सुमीत डांगी म्हणाले, हा व्यवसाय सीझनल आहे. मे आणि जून हा सर्वाधिक कामाचा आणि कमाईचा काळ असतो. मंगलकार्यालयांना हाऊसफुल्ल बुकिंग असते. पण, या वर्षी मे आणि जून हे दोन्ही महिन्यांत फारसे मुहूर्त नाहीत. त्यामुळे व्यावसायिकांकडे काम नाही. मंगलकार्यालयासाठीही बुकिंग नाही. मग, दोन्ही महिन्यांत आर्थिक फटका तर बसणारच.

एप्रिल महिन्यामध्ये छायाचित्रणासाठीचे काम मिळाले आहे. पण, मे आणि जूनमध्ये कामच नाही. त्यामुळे आता काय करावे? हा प्रश्न पडला आहे. दरवर्षी मे आणि जून महिना हा कामाचा असतो. परंतु, यंदा आर्थिक झळ सहन करावी लागणार आहे.

– विवेक गाटे, छायाचित्रकार

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news