Lok Sabha Election 2024 | पालघर : ‘बविआ’च्या भूमिकेकडे लक्ष | पुढारी

Lok Sabha Election 2024 | पालघर : ‘बविआ’च्या भूमिकेकडे लक्ष

मंगेश तावडे

पालघर लोकसभा मतदार संघात राजकीय पक्षाने आपल्या उमेदवाराची घोषणा अद्याप न केल्याने इच्छुक उमेदवार सध्या द्विधा मनःस्थितीत आहेत. पालघरचे प्रतिनिधित्व खासदार राजेंद्र गावित करीत आहेत. 2018 च्या पोटनिवडणुकीत भाजपकडून निवडून आलेले राजेंद्र गावित यांनी 2019 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत युतीकडून शिवसेनेचे खासदार झाले. मात्र, ही जागा पूर्वीपासूनच भाजपची असल्याचा दावा भाजपने केल्याने शिंदे गट मेटाकुटीला आला आहे. महायुती आता विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना पसंती देतात की धक्कातंत्र अवलंबते, याची माहिती मिळाली नसून अन्य स्थानिक पक्ष बहुजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडीनेही उमेदवार जाहीर न केल्याने सर्वच पक्ष सध्या द्विधा मनःस्थितीत आहेत.

सध्या विद्यमान खासदार राजेंद्र गावित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात आहेत. महायुतीमध्ये ही जागा शिंदे सेनेला, की भाजपला आहे, याबाबतही स्पष्टता नाही. भाजपकडून डॉ. हेमंत सवरा, माजी आमदार विलास तरे, संतोष जनाठे आणि भाजपचे दिवंगत आमदार पास्कल धनारे ह्यांचा पत्नी मीना धनारेसुद्धा इच्छुकांच्या यादीत आहेत आणि खासदार गावीतही तिसर्‍या टर्मसाठी इच्छुक आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपचा खासदार शिवसेनेच्या तिकिटावर लढला होता. खा. गावीत यांना तिसर्‍यांदा उमेदवारी मिळाल्यास शिवसेनेचा उमेदवार भाजपच्या तिकिटावर लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावीत शिवसेनेच्या (धनुष्यबाण) निशाणीवर लढणार की भाजपच्या कमळावर हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, गावीत यांना उमेदवारी जाहीर झाली, तर भाजपकडून लढण्यास त्यांच्यावर दबाव येऊ शकतो.

दुसरीकडे पालघरच्या राजकारणातील हुकमी एक्का समजल्या जाणार्‍या आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्यांनी एक मेळावा घेऊन कोणत्याही स्थितीत उमेदवार देणार, अशी घोषणा केल्याने महायुतीमध्ये समावेश असल्याच्या वृत्ताला आता तरी पूर्णविराम मिळाला आहे. सध्या लोकसभा मतदार संघात या पक्षाचे तीन आमदार असल्याची पुष्टी देऊन बोईसरचे विद्यमान आमदार राजेश पाटील लोकसभा लढण्याची शक्यता आहे.

सध्या विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेल्या महाविकास आघाडीनेही आपला तुल्यबळ उमेदवार देण्याचे निश्चित केले आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, मार्क्सवादी कम्युनिस्ट तसेच अनेक आदिवासी संघटना या पक्षांची मोट बांधून उमेदवार निवडून आणण्यासाठी शड्डू ठोकून महायुतीसमोर आव्हान उभे केले आहे. मात्र, उमेदवारी कोणत्या पक्षाकडे जाते, हेही तेवढेच महत्वाचे आहे. सध्या महाविकास आघाडीमध्ये पालघरचे दोन आमदार कार्यरत आहेत. डहाणूचे सीपीएम आमदार विनोद निकोले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नसली, तरी ते महाविकास आघाडीसोबत असल्याचे समजते. विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा शरद पवार यांच्याकडे असल्याने या दोन आमदारांपैकी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भारती कामडी यांचेही नाव महाविकास आघाडीकडून पुढे केले जात आहे. सध्या वाढवण बंदराचा प्रश्न धगधगत असून, महायुतीने या प्रकल्पाला पाठिंबा, तर महाविकास आघाडी विरोध करीत असून, त्याचा फायदा उठवण्याच्या प्रयत्नात आहेत.

पालघर जिल्ह्यात विविध क्षेत्रात कार्यरत असलेले आदिवासी नेते डॉ. विश्वास वळवीसुद्धा यावेळच्या लोकसभेसाठी इच्छुक आहेत. डॉ. वळवी यांनी पालघर जिल्ह्यातील गावागावात आणि घराघरात वैयक्तिक पातळीवर मतदारांशी संपर्क साधला असून, त्यांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.

खा. राजेंद्र गावित हे गेली 25 वर्षे पालघरच्या राजकारणात सक्रिय आहेत. सुरुवातीला ते काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी पालघर विधानसभेत निवडून येऊन काँग्रेसच्या राजवटीत मंत्रीसुद्धा झाले. 2014 च्या लोकसभेनंतर ते भाजपमध्ये गेले. 2014 ला अ‍ॅड. चिंतामण वनगा निवडून आले होते. 2017-18 ला वनगा यांच्या निधनानंतर भाजपने काँग्रेसच्या गावीतना लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उभे केले. तर शिवसेनेने चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना उतरविले. त्यावेळी भाजपने काहीशा फरकाने ही पोटनिवडणूक जिंकली. त्यावेळी भाजपचे खासदार असलेले राजेंद्र गावित यांना 2019 च्या निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेत पाठवून लोकसभेत उतरवले आणि बविआचे बळीराम जाधव यांच्याशी लढतीत 88 हजारच्या मताधिक्याने गावीत जिंकले.

गेली तीन टर्म पालघर जिल्ह्यातील खासदार

2009 – बळीराम जाधव, बविआ (223234)
2014 – अ‍ॅड. चिंतामण वनगा, भाजप (533201)
2019 – राजेंद्र गावित, शिवसेना (580479)
2019 च्या लोकसभेत 29479 जणांनी यापैकी कोणताही उमेदवार नाही, अशी पुष्टी जोडली होती. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत ‘नोटा’चा प्रभाव दिसणार, हे नक्की झाले आहे.

Back to top button