

इंदापूर : मागील काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसाचा भाजीपाला पिकातील टोमॅटो या पिकास मोठा फटका बसला आहे. 72 दिवसानंतर टोमॅटो तोडणीस आल्यानंतर पावसाचे पाणी साचल्याने ओला करपा रोग पडल्याने वेल काळे पडून उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यातच टोमॅटोचे भाव गडगडल्याने सर्वच भागातील शेतकऱ्यांना खूप तोटा सहन करावा लागत आहे. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे यामुळे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.(Latest Pune News)
निमगाव केतकी (ता. इंदापूर) परिसरातील अनेक शेतकरी अल्पकाळात भरपूर रोख उत्पन्न देणारे पीक म्हणून टोमॅटो हे पीक घेतात. टोमॅटोचे पीक नगदी व भांडवली असल्याने लागवडीपासून या पिकासाठी भांडवली गुंतवणूक करावी लागते. यासाठी नवनवीन सुधारित जातीची वाण बाजारात आले आहेत. 100 ग््रॉम बियाण्यांसाठी 1 हजार 500 रुपयांपर्यंत लागवडीसाठी खर्च येतो. लागवडीपासून प्रत्यक्ष उत्पन्न सुरू होईपर्यंत या पिकाची खूपच काळजी घ्यावी लागते. शिवाय खर्चही मोठा येतो.
यामध्ये बेड तयार करणे, मल्चिंग पेपर अंथरणे, ठिबक सिंचन, कीटकनाशक फवारणी खर्च, आंतर मशागतीचा खर्च, खतांचा खर्च असतोच. परंतु याहीपेक्षा खर्चीक काम असते ते टोमॅटो झाडांना फळे आल्यानंतर आधार देण्यासाठी लागणाऱ्या काठ्या व बांधाव्या लागणाऱ्या तारा, सुतळ्या आणि त्यासाठी द्यावी लागणारी मजुरी. ज्यावेळी प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात होते त्यावेळी खर्च मोठ्या प्रमाणात होतो.
परंतु मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावल्यामुळे पिकातील पाण्याचा निचरा न झाल्याने फळाला पोषक अन्नद्रव्य मिळाली नसल्याने करपा रोग पडून वेलासह फळे काळी पडली आहेत. तोडणीला मजुरी द्यावी लागत असून तेवढ्या प्रमाणात पैसे येत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. तिरंगा टोमॅटोला केवळ 50 रुपये कॅरेट इतके दर कमी मिळत असून काही शेतकऱ्यांनी तोडणी परवडत नसल्यामुळे टोमॅटोचे पीक सोडून दिली आहेत. शासनाने अतिवृष्टी झालेल्या व या परिसरातील टोमॅटो पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी राजू भोंग, तुषार खराडे, शंकर भोंग यासह इतर टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
निमगाव केतकी परिसरात टोमॅटो पिकाची झालेली अवस्था. (छाया : जावेद मुलाणी)