निमगाव केतकीत तीव्र पाणीटंचाई; टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ

निमगाव केतकीत तीव्र पाणीटंचाई; टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ

इंदापूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच चालल्याने इंदापूर तालुक्यातील बर्‍याच गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. निमगाव केतकीत पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली असून, सर्व विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. वरकुटे खुर्द पाझर तलावात निरा डावा कालव्याच्या आवर्तनातून केवळ 48 तासच पाणी अत्यंत कमी दाबाने सोडल्याने आणखीन किमान चार दिवसतरी पाणी सोडावे, अशी मागणी गावकरी करीत आहेत.

ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेतून अत्यंत कमी दाबाने पाणी येत असल्याने पर्यायाने नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. सातशे लिटर पाण्याला 300 रुपये, एक हजार लिटरला चारशे रुपये द्यावे लागत असल्याचे गावातील महेबूब मुलाणी व धनंजय राऊत यांनी सांगितले. डिझेलचे दर वाढल्याने टँकरचा व्यवसाय परवडेनासा झाल्याचे पाणी विक्रेते सागर भोसले यांनी सांगितले. सध्या प्रचंड उकाडा असला तरी केवळ पाण्यासाठी घराबाहेर पडावे लागते, असे सीताबाई मिसाळ यांनी सांगितले.

निरा डाव्या कालव्याचे आवर्तन सुरू असल्याने त्यातून वरकुटे खुर्द पाझर तलावात पाणी सोडावे. या तलावाच्या पाण्यावर निमगाव केतकीतील गावठाणासह चार पिण्याच्या पाण्याच्या योजना अवलंबून आहेत. तसेच वरकुटे खुर्द गावाची पिण्याच्या पाण्याची योजना याच तलावावर अवलंबून आहे. तलावात सध्या खूपच कमी पाणीसाठा आहे.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासह हजारो वैष्णवभक्त निमगाव केतकी गावात मुक्कामी येत असतात. त्यांच्यासाठी पाण्याची सोय व्हावी म्हणून आणखी पाणी सोडणे गरजेचे असल्याचे गावचे सरपंच प्रवीण डोंगरे यांनी सांगितले. सध्या शेतीच्या सिंचनासाठी निरा डावा कालव्याचे आवर्तन सुरू आहे. वरकुटे तलावात 48 तास पाणी सोडले होते. संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी लवकरच तलावात पाणी सोडण्यात येईल, असे बारामती जलसंपदा विभागाचे उपअभियंता अश्विन पवार त्यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news