नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील निमगाव सावा येथील लक्ष्मण सावे यांच्या शेतामध्ये वन खात्याने लावलेल्या पिंजऱ्यात आज दिनांक 1 जून 2024 रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती ओतूरचे वनक्षेत्रपाल वैभव काकडे यांनी दिली. पकडलेला बिबट्या पाच ते सहा वर्षाचा असून तो नर बिबट्या आहे. निमगाव सावा परिसरामध्ये गेल्या पंधरा-वीस दिवसापासून बागवाडी परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने व त्याचे दिवसाही दर्शन होऊ लागल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे वन व खात्याने या ठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केलेली होती. त्यामुळे वन खात्याने स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार या भागामध्ये वन खात्याने पिंजरा लावला होता.
दरम्यान सध्या जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या कमी होण्याचे काही नाव घेत नाही. गेल्या महिन्याभरात सुमारे 12 बिबटे वन खात्याने पकडले आहेत.हे पकडलेले माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रामध्ये ठेवण्यात आलेले आहेत. काळवाडी व पिंपरी पेंढार या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात ज्या दोन दुर्घटना झाल्या तेव्हापासून वन खात्याने पकडलेले बिबटे सोडून देण्याचे बंद केले आहे. बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पाळीव प्राण्यांवर हल्ले करून त्यांना फस्त करणे हे तर आता नित्याचे झाले आहे. तसेच मेंढपाळांच्या वाड्यावर बिबट्याचे दर्शन रोजचे झाले असून या लोकांची मेंढर देखील बिबट्या फस्त करीत आहे.
यापूर्वी बिबट्याचे दर्शन कधीतरी व्हायचे परंतु सध्या बिबट्याचे दर्शन दररोज होऊ लागले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना आपल्या शेतामध्ये जाणे भीतीचे वाटू लागले आहे. वन खात्याकडून शेतकरी बांधवांना जरी कितीही समुपदेशन केले जात असले तरी बिबट्याची भीती लोकांच्या मनामधून जात नाही. यापूर्वी बिबट्या सायंकाळी सहाच्या नंतर दृष्टीस पडायचा परंतु आता मात्र बिबट्या भर दिवसा ही मोकाट फिरताना दिसत आहे. जुन्नर तालुक्यामध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या आता कमी होऊ लागली असून बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढते ही मोठी चिंतेची बाब ठरत आहे. बिबट्या हा प्राणी मांजर प्रवर्गातील असल्याने त्याची पिल्ले देखील झपाट्याने वाढत आहेत. जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याला पोषक वातावरण व निवारा, पाणी आणि भक्ष सहज उपलब्ध होत असल्याने त्याचे वास्तव्य या भागामध्ये वाढले आहे.
दरम्यान नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्रा जवळ दोन दिवसांपूर्वी बिबट्या रस्त्यावर राजरोसपणे फिरत असल्याचे स्थानिक नागरिकांनी पाहिल्याने याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वन खात्याने कृषी विज्ञान केंद्राजवळ बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा देखील लावला आहे. सध्या वन खात्याकडे पिंजऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. शासनाने नवीन पिंजरे देण्याची अनुमती दर्शवली आहे. मात्र हे पिंजरे मिळण्यासाठी काही कालावधी जाणार आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या पिंजऱ्यावरच वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे.
दररोज कुठे ना कुठे पिंजरा लावण्याची मागणी होत आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या पिंजऱ्यामधूनच ऍडजेस्टमेंट करण्याची वेळ वन खात्याच्या कर्मचाऱ्यांवर येत आहे. एका ठिकाणी लावलेला पिंजरा दुसऱ्या ठिकाणी लावणे तेवढे सोपे नसते. पिंजरा हलवण्यासाठी वाहन उपलब्ध करणे पिंजरा गाडीमध्ये चढवणे गाडीतून उतरवणे यासाठी मनुष्यबळ देखील उपलब्ध करावे लागते. तालुक्यामध्ये बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे व बिबट्यांच्या होणाऱ्या हल्ल्यामुळे आणि जनतेच्या रोषामुळे वन खात्याचे कर्मचारी देखील हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा