

पुणे: नीलेश चव्हाण याचा शशांक हगवणे आणि वैष्णवी यांच्या लग्नबैठकांमध्ये सहभाग होता. तसेच दोघांच्या वाद-विवादांमध्ये सक्रिय सहभाग होता, तसेच वैष्णवीचे सासरे राजेंद्र आणि दीर सुशील यांच्या मदतीने सासू लता, नणंद करिष्मा यांचे मोबाईल त्याने पळविले आहेत, त्यामुळे नीलेश चव्हाण, राजेंद्र आणि सुशील हगवणे यांना समोरासमोर बसवून बावधन पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात फरार असलेल्या नीलेश चव्हाण (वय 34, रा. औदुंबर सोसायटी, कर्वेनगर) याला नेपाळ सीमेवरून अटक करून शनिवारी न्यायालयात हजर केले. त्याला 3 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर सासरे राजेंद्र हगवणे (वय 54 आणि सुशील हगवणे (वय 27, रा. दोघेही रा. मुक्ताई गार्डनजवळ, भुकूम, मुळशी) यांच्या पोलिस कोठडीत 3 जूनपर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांनी दिले. (Latest Pune News)
चव्हाणने इतर आरोपींच्या मदतीने वैष्णवीचा केला छळ
नीलेश चव्हाणकडे परवानाधारक शस्त्र आहे. त्याचा वापर करून त्याने वैष्णवीला छळ करण्यासाठी धमकावल्याची शक्यता आहे. नीलेश चव्हाण हा वैष्णवीची नणंद करिष्माचा जवळचा मित्र आहे. त्याने इतर आरोपींच्या मदतीने कट रचून चिथावणी, अपप्रेरणा दिली आहे. शशांक, सुशील आणि राजेंद्र हगवणे यांच्यासोबत नीलेश चव्हाणचे आर्थिक संबंध आहेत, याचा तपास करायचा आहे.
वैष्णवीची सासू लता आणि नणंद करिष्मा हगवणे यांचा मोबाईल नीलेश चव्हाणकडे देण्यात आले होते. गुन्हा घडल्यानंतर तो नेपाळ येथे पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याला पळून जाण्यासाठी मदत कोणी केली, कुठल्या मार्गाने तो तिथंपर्यंत पोहोचला.
वैष्णवीच्या मुलाचे पालकत्व नसताना आणि अनाधिकाराने बालकाला कुठल्या कारणासाठी त्याने ताब्यात ठेवले होते. या गुन्ह्यातील पूर्वीचे आरोपी आणि चव्हाण याचेमध्ये झालेले संभाषण चॅटिंगचा तपास करायचा आहे.
राजेंद्र आणि सुशील हगवणे यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या वस्तूंबरोबर हुंडा म्हणून रोख रक्कमेसह इतर वस्तू घेण्यात आल्या आहेत. ते जप्त करायच्या असल्याने पोलिस कोठडी देण्याची मागणी तपास अधिकारी अनिल विभुते आणि सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. तर बचाव पक्षाच्या वतीने बाजू मांडताना स्वानंद गोविंदवार यांनी सांगितले की, नीलेश हा हगवणे कुटुंबीयांचा नातेवाईक नसल्याने त्याला या गुन्ह्यात अटक करणे बेकायदेशीर आहे.
नीलेशकडे सहआरोपीचे मोबाईल असू शकतात, ही तपास यंत्रणांची बिनबुडाची भूमिका आहे. नीलेश चव्हाण हगवणे कुटुंबाला मदत करत होता, म्हणून त्याला आरोपी करण्यात आले आहे. नीलेश चव्हाणने त्याच्यावर दाखल गुन्ह्यात नेहमीच पोलिसांना सहकार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने 3 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.