

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना तब्बल चार महिन्यांच्या विलंबाने दिवाळीत गणवेश व स्वेटर मिळणार आहेत. तसा नवा मुहूर्त शिक्षण विभागाने जाहीर केला आहे. त्यावरून प्रशासकीय राजवटीत शिक्षण विभागाचा संथगती कारभार उघड झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पालक रोष व्यक्त करीत आहेत. महापालिकेच्या बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळेत तब्बल 51 हजार विद्यार्थी शिकत आहेत. शाळा 13 जूनला सुरू झाल्या. अद्याप पालिकेच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन शालेय गणवेश, एक पीटी गणवेश व एक स्वेटर तसेच, इतर शालेय साहित्य मिळालेले नाही. त्यामुळे पालकांसह विद्यार्थी नाराज आहेत. त्याबाबत विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी आंदोलनही केले आहे. मात्र, ढिम्म शिक्षण विभागाकडून वेगात हालचाली होत नसल्याने चार महिने उलटूनही अद्याप सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य मिळालेले नाही.
तत्कालीन आयुक्त राजेश पाटील व तत्कालीन अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी शिक्षण विभागाच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेतला नाही. त्या फाईलीकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे हजारो विद्यार्थी साहित्यापासून अद्याप वंचित आहेत. न्यायालयाच्या निर्णयामुळे साहित्य वितरणास विलंब होत असल्याचे उत्तर देऊन अधिकारी आपली जबाबदारी झटकत असल्याचे चित्र आहे. अखेर, गेल्या महिन्यात आयुक्तांनी मंजुरी दिली. त्यानंतर तातडीने कार्यवाही होणे गरजेचे असताना अद्याप त्याबाबत ठोस निर्णय शिक्षण विभागाने घेतला नाही. दुसरीकडे श्री महालक्ष्मी ड्रेसेस या पुरवठादाराने 1 लाख 2 हजार गणवेश आणि प्रेस्टिंज गारमेंन्ट या पुरवठादाराने 51 हजार पीटी गणवेशांचा पुरवठा सोमवारी (दि.12) शिक्षण विभागास केला आहे. तर, वैष्णवी महिला कॉर्पोरेशन पुरवठादाराने 51 हजार स्वेटरचा पुरवठा केला आहे. या सर्व गणवेशांचा दर्जा तपासणीची कार्यवाही शिक्षण विभागाकडून सुरू आहे. आठवडा लोटला तरी, अद्याप अहवाल पूर्ण झालेला नाही. त्यामुळे गणवेश व स्वेटर फुगेवाडी शाळेत पडून आहेत. परिणामी, दिवाळीपूर्वी विद्यार्थ्यांना गणवेश मिळतील, असा दावा अधिकार्यांकडून केला जात आहे.
न्यायालयीन प्रक्रियेमुळे विलंबाचे तुणतुणे
गणवेश व स्वेटर खरेदीसाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली होती. त्या विरोधात पुरवठादारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने नियमानुसार संबंधित पुरवठादारांकडून गणवेश व स्वेटर खरेदी करण्याचे आदेश तीन महिन्यांपूर्वी दिले होते. मात्र, त्यानंतर तत्काळ कार्यवाही न करता शिक्षण विभागाने न्यायालयीन प्रक्रियेमुळे विलंब होत असल्याचे तुणतुणे लावून धरले. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये संभ—म निर्माण झाला आहे.
अहवाल प्राप्त झाल्यानंतर गणवेशाचे वितरण
महापालिका व पुरवठादार यांच्यातील करारानुसार गणवेशाचा कापडाचा दर्जा तपासणीसाठी इंचलकरंजी येथील संस्थेकडे पाठविले आहेत. अद्याप त्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झालेला नाही. अहवाल प्राप्त झाल्यानंतर तत्काळ गणवेश व स्वेटरचे वितरण केले जाईल, असे शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी सांगितले.