

पुणे, पुढारी वृत्तसेवा: उरुळी देवाची येथील महापालिकेच्या कचरा डेपोच्या परिसरातील कचरा प्रक्रिया प्रकल्पांच्या छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. या माध्यमातून दैनंदिन 300 ते 400 युनिट वीजनिर्मिती होत आहे.
उरुळी देवाची येथील कचरा डेपो आणि प्रकल्पासंदर्भात हरित लवादामध्ये दाखल झालेल्या एका याचिकेच्या सुनावणीमध्ये महापालिकेला दोन कोटी रुपये सॉल्व्हन्सी (जात मुचलका) भरण्याचे तसेच या रकमेतून कचरा डेपो परिसरात पर्यावरणपूरक कामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेने कचर्यापासून निर्माण होणारे लिचेड वाहून नेण्यासाठी गटारे बांधली आहेत. तसेच कचरा डेपोच्या रॅम्पवर आणि उर्वरित जागेवर वृक्षारोपण केले आहे. उरलेल्या 50 ते 55 लाख रुपये खर्चातून कचरा डेपोच्या आवारात प्रक्रिया प्रकल्पांसाठी उभारण्यात आलेल्या शेडवर सोलर पॅनल बसवून सौर ऊर्जा निर्माण करण्याचे काम हाती घेतले आहे.
येथील प्रकल्पांच्या छतावर सोलर पॅनल बसवून 100 किलो वॅट ऊर्जानिर्मिती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यातून निर्माण होणाऱ्या विजेवर कचरा डेपोच्या आवारातील पथदिवे, वजनकाटा, तसेच पंप हाऊसच्या मोटारी, सीसीटीव्ही यंत्रणा चालविली जाणार आहे. सध्या या सोलर पॅनलच्या माध्यमातून दिवसाला 300 ते 400 युनिट वीजनिर्मिती होत आहे. ही वीज त्याच ठिकाणी वापरली जात असून, उन्हाळ्यामध्ये वीजनिर्मितीचे प्रमाण वाढणार असल्याची माहिती विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुल यांनी दिली.