Pimpri News : उपनगरातील गुन्हेगारी उखडण्यासाठी नवीन पोलिस ठाणी

Pimpri News : उपनगरातील गुन्हेगारी उखडण्यासाठी नवीन पोलिस ठाणी

पिंपरी(पुणे) : पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयातील वाकड पोलिस ठाण्याच्या अखत्यारीत काळेवाडी, रहाटणी परिसर येतो. संमिश्र लोकसंख्या असेलला हा परिसर आहे. मागील काही वर्षांत या परिसरातील वाढती गुन्हेगारी पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे. पिंपरीतील झोपडपट्टीत राहणार्‍या गुन्हेगारी वृत्तीच्या तरुणांची या परिसरात वर्दळ असते. त्यामुळे या भागात नेहमी कुरबुरी सुरू असतात. नंग्या तलवारींचा नाच करीत टोळक्यांकडून धुडगूस घालण्याचे प्रकारदेखील या भागात वरचेवर घडत असतात.

पोलिस ठाण्यापासून हा भाग साडेचार किलोमीटरच्या अंतरावर आहे. त्यामुळे तत्काळ मोठ्या स्वरूपात पोलिस मदत मिळणे शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर येथे स्वतंत्र पोलिस ठाणे व्हावे, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली होती. या मागणीचा विचार करीत खात्यातील उच्च पदस्थ अधिकार्‍यांनी काळेवाडीसाठी स्वतंत्र पोलिस ठाणे करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, महासंचालक कार्यालयाला प्रस्ताव पाठवण्यात आला असून, पोलिस ठाणे उभारण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

परिसरात सर्व धर्मियांचे वास्तव्य

काळेवाडी, रहाटणी परिसरात सर्व धर्मियांची घरे आहेत. काही समाजकंटक त्यांच्यात वाद पेटवण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे या परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर आहे. तसेच, या भागामध्ये घरफोड्या, चैन चोरी, लूटमार आदी प्रकार देखील इतर भागांच्या तुलनेत जास्त आहेत. रहाटणी हा परिसर वेगाने विकसित होत असून येथील बळीराज कॉलनी, किनारा कॉलनी, कृष्णा कॉलनी, नखातेनगर या परिसरात गाड्यांची तोडफोड करून दहशत माजविण्याचे प्रकार घडल्याच्या नोंदी आहेत. या भागाची लोकसंख्या जास्त असल्याने वाकड ठाण्याचे विभाजन करून काळेवाडी, रहाटणी परिसरासाठी स्वतंत्र ठाणे सुरू करण्याचे विचाराधीन होते.

कामगारांची संख्या जास्त

काळेवाडी रहाटणी परिसरात परगाव तसेच परराज्यातून आलेला कामगारवर्ग जास्त आहे. येथे सुमारे 20 ते 25 हजार कामगार राहत असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. येथे राहणारे कामगार हिंजवडी, पिंपरी, तळेगाव एमआयडीसी, एमआयडीसी भोसरी, महाळुंगे एमआयडीसी, पुणे परिसरात कामासाठी जातात. वाढत्या लोकसंख्येमुळे या भागात जागेच्या किमती वाढत असून, जागा कमी पडू लागल्या आहेत. त्यामुळे जमिनीचे वाद निर्माण होऊन तक्रारीअर्ज दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे. परिसरातील पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाच्या जागेवर अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. यापूर्वी येथे अनेकदा कारवाईदेखील झाली आहे. त्यामुळे येथील नागरिक आंदोलन करतात. त्यामुळे शांतता भंग पावण्याची शक्यता निर्माण होते.

तत्काळ मदत मिळणे होईल शक्य

काळेवाडी, रहाटणी भागात गुन्हा घडल्यास सुमारे साडेचार किलोमीटर अंतरावर असलेल्या वाकड पोलिस ठाण्यास जावे लागते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तात्काळ पोलिस मदत मिळत नाही. या व्यतिरिक्त या भागात वाहतुकीचे प्रमाण प्रचंड असल्याने वारंवार अपघात होतात. तसेच, या मार्गावरून अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या वाहनांचा ताफा जात असतो. त्यांना एस्कॉर्टसाठी व रोड बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी आणि वाहने पुरवावी लागतात. या नियोजनासाठी वाकड पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या काळेवाडी चौकीतील मनुष्यबळ अपुरे पडत होते. आता स्वतंत्र पोलिस ठाणे कार्यान्वित झाल्यानंतर या कामांचे योग्य नियोजन करता येणार आहे.

पिंपरी- चिंचवड शहरातील उपनगरांमध्ये गुन्हेगारी वाढू लागली आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी पोलिस ठाण्याचे विभाजन करून नवीन पोलिस ठाणी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे प्रस्तावदेखील पाठवण्यात आले असून महासंचालक कार्यालयाकडून नवीन ठाण्यांना लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये काळेवाडी, दापोडी, संत तुकाराम नगर आणि बावधन पोलिस ठाण्यांचा समावेश आहे. नवीन होणारी पोलिस ठाणी कशी आणि कोठे असणार आहेत, कोणता परिसर या ठाण्यांच्या अखत्यारीत येणार आहे, या परिसरासाठी नवीन ठाणी का होत आहेत, अशा अनेक मुद्द्यांवर 'पुढारी'ने वृत्त मालिकेद्वारे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

इथे होणार पोलिस ठाणे

काळेवाडी येथील नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेत नवीन पोलिस ठाणे होणार आहे. प्राधिकरणाने पोलिस ठाण्यासाठी जागा राखीव ठेवली आहे. याठिकाणी लवकरच काम सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

काय आहे काळेवाडी आणि रहाटणी परिसरात

  • पोलिस ठाण्यापासून साडेचार किलोमीटर अंतरावर चौकी
  • सुमारे दीड लाख लोकसंख्या
  • चार शैक्षणिक संस्था, दोन कॉलेज, एक वसतीगृह, सुमारे 8 हजार विद्यार्थी संख्या
  • शासकीय / खासगी कार्यालय, 4 पतपेढ्या, 11 बँका, 4 पेट्रोल पंप
  • तीन मॉल, एक मल्टिप्लेक्स थियेटर
  • 8 मंगल कार्यालय, 3 कारखाने

अशी असेल काळेवाडी पोलिस ठाण्याची हद्द

  • काळेवाडी फाटा ते तापकीर चौक काळेवाडीकडे जाणार्‍या मुख्य रस्त्याच्या डावे बाजूला असलेला फुटपाथ वगळून
  • तापकीर चौकापासून काळेवाडीकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यांसह दोन्ही बाजूचे फुटपाथ
  • एमएम कॉलेज समोरील डॉ. हेडगेवार पुलाकडे जाणारा रस्त्यासह रस्त्याची उजवी बाजू
  • एमएम कॉलेज चौक ते एम्पायर इस्टेट नदीपात्रापर्यंतचा बीआरटी रोड
  • डॉ. हेडगेवार पुलापासून पवनानदी पात्रासह पवनानगर
  • पवनेश्वर पुलापासून ते रहाटणी घाटापर्यंत पवना नदीचे पात्र
  • छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून जगताप डेअरी चौकापर्यंत संपूर्ण रस्ता (डाव्या बाजूचे फुटपाथ वगळून)
  • जगताप डेअरीपासून काळेवाडी फाटा औंध रावेत बीआरटी रोड रस्त्याचे उजवे बाजूच्या फुटपाथ
  • काळेवाडी फाटा, तापकीर चौक, काळेवाडी गावातील कोकणेनगर, नढेनगर, आदर्शनगर, राजवाडे कॉलनी, महाराष्ट्र कॉलनीचा संपूर्ण परिसर
  • रहाटणी गावातील किनारा कॉलनी, बळीराज कॉलनी, नखातेवस्ती, शिवराजनगर, रामनगर परिसर
  • नदीपात्र व रस्त्याच्या सीमांच्या अंतर्गत येणार्‍या सर्व कॉलनी, रहिवाशी, वाणिज्य व औद्योगिक परिसर

काळेवाडीसाठी मिळणारे मनुष्यबळ

  • पोलिस निरीक्षक – 2
  • सहायक निरीक्षक – 5
  • उपनिरीक्षक – 5
  • सहायक उपनिरीक्षक – 15
  • हवालदार – 30
  • पोलिस नाईक – 35
  • पोलिस शिपाई – 70
  • सफाई कामगार – 2

काळेवाडी परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी स्वतंत्र पोलिस ठाण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. महासंचालक कार्यालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर पोलिस ठाणे कार्यान्वित करण्यात येईल.

– सतीश माने, सहायक पोलिस आयुक्त, पिंपरी- चिंचवड.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news