पुणे : नामफलकाचे नवे धोरण लवकरच; आयुक्तांच्या मान्यतेची प्रतीक्षा

पुणे : नामफलकाचे नवे धोरण लवकरच; आयुक्तांच्या मान्यतेची प्रतीक्षा
Published on
Updated on

हिरा सरवदे
पुणे : महापालिकेच्या निधीतून विविध वास्तू, रस्ते आणि चौकांमध्ये उभारल्या जाणार्‍या नामफलकांसंदर्भात प्रशासनाने नवीन धोरण तयार केले असून, याला आयुक्तांच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे. नवीन धोरणानुसार नामफलकावर 'संकल्पना' असणारच आहे. मात्र, त्या अक्षरांचा आकार इतर अक्षरांपेक्षा लहान राहणार आहे. महापालिकेकडून शहरात विकासकामे केली जातात. विविध वास्तू आणि प्रकल्प उभारले जातात. ही कामे मुख्य खात्यांसह नगरसेवकांच्या विकास निधीतूनही केली जातात. या ठिकाणी प्रशासनाकडून निळ्या किंवा हिरव्या रंगाचे नामफलक लावले जातात. त्यानंतरही नगरसेवकांकडून विकास निधी खर्च करण्यासाठी पुन्हा नामफलक लावले जातात.

या नामफलकांवर वास्तूच्या नावापेक्षा संकल्पना म्हणून नगरसेवक स्वतःचे नाव मोठ्या अक्षरांत टाकतात. एका प्रभागात एकापेक्षा जास्त नगरसेवक असल्याने एकाच ठिकाणी चार-पाच नामफलक उभे करण्यात आले आहेत. नामफलक कोणत्या रंगाचा असावा, त्याचा आकार काय असावा, याचे संकेत ठरलेले आहेत.

असे असतानाही मागील काही वर्षांपासून पालिकेच्या निधीतून उभारलेल्या नामफलकांच्या माध्यमातून स्वतःसह पक्षाची, नेत्यांची फुकटची प्रसिद्धी करून घेण्याचे नवीन फॅड आले आहे. त्यानंतर आता 'आय लव्ह…' असे इलेक्ट्रॉनिक नामफलक चौकांमध्ये, रस्त्याच्या कडेला, पदपथावर उभे करण्याचे प्रमाण वाढले आहे. पथ विभाग किंवा विद्युत विभागाची कोणतीही परवानगी न घेता नामफलक उभारणे आणि त्याला बेकायदा वीज जोडण्याचे उद्योग सर्रासपणे सुरू आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पथ विभागाने महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार पाच ते सहा महिन्यांपूर्वी नामफलकांसंदर्भात मार्गदर्शक सूचना असणारे नवीन धोरण तयार केले आहे. मात्र, त्याला अद्याप मान्यता मिळालेली नाही. हे धोरण चर्चेतच अडकले आहे. दरम्यान, हे धोरण अमलात आणले तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय रोषाला सामोरे जावे लागेल. या शक्यतेमुळे ते मंजूर केले जात नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

धोरणात काय आहे….

अशा आहेत सूचना…
मराठी किंवा इंग्रजी नामफलकाचा आकार, त्यावरील अक्षरांचा आकार किती असावा, नामफलकाचा रंग कोणता असावा, जमिनीपासून किती उंचीवर नामफलक असावा, धातूचे फलक कसे असावेत, प्रकाशझोत असलेले नामफलक कसे असावेत, एलईडी नामफलक कसे असावेत, नामफलकासाठी कोणते साहित्य वापरावे आदी मार्गदर्शक सूचनांचा या धोरणात समावेश आहे.

  • रस्ते, चौक आणि वास्तू येथे लावले जाणारे नामफलक
  • नामफलकाच्या एका बाजूस मराठी, तर दुसर्‍या बाजूस इंग्रजी अक्षरे असावीत
  • नामफलकाच्या खांबाचा व्यास 80 मिमी असावा
  • नामफलकाची जमिनीपासूनची उंची 7 मीटर (2100 इंच) असावी
  • नामफलकाचा आकार 700 मिमी बाय 500 मिमी असावा
  • नामफलकावरील महापालिकेचे नाव 150 मिमी जाडीचे असावे
  • नामफलकावरील शीर्षक 225 मिमी जाडीचे असावे
  • नामफलकावरील संकल्पना नाव 100 मिमी जाडीचे असावे
  • नामफलकाचा रंग आकाशी, निळा आणि पिवळसर हिरवा असावा

विविध वास्तूंना लावले जाणारे मोठे नामफलक
या फलकाचा आकार 1.5 मी. बाय 5 मी. किंवा 1.5 मी. बाय 6 मी. असावा. या फलकांचा रंग पांढरा, बदामी, आकाशी असावा.
या फलकावरील अक्षरांमध्ये महापालिकेचे नाव 12 इंच, शीर्षक 9 इंच आणि संकल्पना नाव 6 इंच असावे.
हे नामफलक अ‍ॅक्रॅलिक, आतील बाजूस लाइट असणारे, प्रिंटेड बोर्ड आणि बाहेरून लाइट मारलेले आणि थ्री डी अक्षरे असलेले असावेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news