

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सध्या बालनाटकांचे प्रयोग होत असले, तरी त्यांची संख्या तुलनेने कमी आहे. त्यामुळे बालरंगभूमीला अजूनही आर्थिक झळ सोसावी लागत आहे. त्यामुळेच आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने नाट्य संस्थांकडून नवीन व्यावसायिक बालनाटकांची निर्मितीही थांबली असून, उन्हाळ्याच्या ऐन सीझनमध्ये लहान मुलांना सुट्यांमध्ये जुनीच व्यावसायिक बालनाटके रंगभूमीवर पाहावी लागणार असल्याचे चित्र आहे. काही संस्थांकडून नवीन नाटकांच्या निर्मितीचा प्रयत्न सुरू असला तरी आर्थिक जुळवाजुळव करणे संस्थांसाठी अवघड जात आहे.
परीक्षा संपून शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्या लागणार असल्याने एप्रिल ते जून हा सीझन बालरंगभूमीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असतो. यंदा सीझनमध्ये बालरंगभूमीवर नवीन व्यावसायिक बालनाटके येतील, अशी आशा होती. परंतु, अजूनही बालरंगभूमी आर्थिक झळ सोसत असल्याने नवीन नाटक करणे नाट्य संस्थांना परवडणारे नसल्याने सीझनमध्ये नवीन व्यावसायिक बालनाटकांची निर्मिती फारसी होत नसून, फक्त काही नाट्य संस्थांची प्रायोगिक बालनाटके लहान मुलांना पाहता येणार आहेत. सोमवारी (दि. 20) साजर्या होणार्या जागतिक बालरंगभूमी दिनानिमित्त दै. 'पुढारी'ने याबाबत आढावा घेतला.
बालरंगभूमी परिषदेचे प्रकाश पारखी म्हणाले की, व्यावसायिक बालनाटकांचे प्रयोग रंगभूमीवर तसेही फारसे होत नाहीत. काहीच संस्थांकडून त्यांची निर्मिती होते. अशा नाटकांसाठी शनिवार आणि रविवार नाट्यगृहांच्या तारखा मिळत नाहीत. मुंबईतील काही संस्थांकडून अशी नाटके होतात. पण, पुण्यातील संस्थांना ते परवडत नाही; म्हणूनच पुण्यातील संस्थांकडून नवीन व्यावसायिक नाटकांची निर्मिती थांबली आहे. एप्रिल ते जून या सीझनमध्ये आम्ही प्रायोगिक नाटकांच्या प्रयोगांवर भर देणार आहोत.
बालनाटकांचे दिग्दर्शक देवदत्त पाठक म्हणाले की, व्यावसायिक बालनाटकांपेक्षा रंगभूमीवर आताच्या घडीला प्रायोगिक बालनाटके सर्वाधिक प्रमाणात होत आहेत. व्यावसायिक बालनाटक करणे बहुतांश नाट्य संस्थांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. आर्थिक कारणांमुळेच नवीन व्यावसायिक बालनाटक यंदाच्या सीझनमध्ये पाहायला मिळणार नाही. निर्मात्यांना तो खर्च करणे, जाहिरातींचा खर्च करणे परवडणारे नाही. त्यामुळे सीझनमध्ये जुन्याच नाटकांचे प्रयोग पाहायला मिळतील. आम्ही प्रायोगिक नाटकांचे प्रयोग करतो. कारण, ते आम्हाला परवडणारे आहे.